वाळूज महानगर : रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने एका बैलाचा तडफडून मृत्यू झाला. तर मालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक बैल बालंबाल बचावला. बैलगाडीतील तीन मुले बाहेर फेकली गेल्याने किरकोळ जखमी झाली. ही घटना सोमवारी सकाळी सव्वानऊ वाजता बजाजनगरातील अॅक्सिस बँकेजवळ घडली. प्लॉट नंबर एक्स- ५१ समोरील विद्युत खांबावरून समोरच असलेल्या अॅक्सिस बँकेला जमिनीखालून विद्युत जोडणी देण्यात आलेली आहे. खांबालगत रस्त्यावरील खड्ड्यात अवकाळी पावसामुळे पाणी साचले आहे. बँकेला वीजपुरवठा करणारी वायरिंग उघडी पडली आहे. त्यामुळे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह उतरला. आज सकाळी शिवा रणछोड हे आपल्या तीन लहान मुलांसह बैलगाडी घेऊन वाळूज शिवाराकडे जात होते. मुले गाडीत होती तर शिवा मागे पायी चालत होते. बँकेच्या बाजूने जात असताना गाडीला असलेल्या एका बैलाचा रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात पाय पडला. विजेचा धक्का लागून बैल तडफडून जागेवरच मरण पावला, तर गाडीतील मुले बाहेर फेकली गेल्याने किरकोळ जखमी झाली.
विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू; तीन मुलांचे वाचले प्राण
By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST