रमेश शिंदे , औसातालुक्यात खरीप पेरण्यासाठी तब्बल महिनाभर उशिराने पाऊस झाला़ पावसाला सुरूवात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ पण पेरण्या झाल्यानंतर पाऊसच गायब झाला असल्याने पाण्याअभावी कोवळी पिके कोमेजू लागली आहेत़ पाऊस नसल्यामुळे पाणी टंचाईचाही प्रश्न कायम आहे़ ५० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उगवण न झाल्याने दुबार पेरणी केली़ या पिकांना पावसाची गरज आहे़ चार दिवसात पाऊस न पडल्यास पिके वाळूण जाण्याचा धोका निर्माण झाला आहे़ त्यामुळे एकूणच तालुक्यावर दिवसें-दिवस दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे़ औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेला तालुका आहे़ सिंचनाचे क्षेत्र अगदी बोटावर मोजण्याइतके आहे़ तालुक्यात ९ लाख २९ हजार ७२० हेक्टर क्षेत्र आहे़ यापैकी जवळपास १ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होते़ तालुक्यातील पावसाची वार्षीक सरासरी ८१३ मी़मी़आहे़ आत्तापर्यंत पावसाळ्याचे दोन महिने संपले अन् फक्त १४९ मी़मी़इतकाच पाऊस झाला आहे़ १० जुलै पासून तालुक्यात पेरण्या सुरू झाल्या होत्या़ पेरणीच्यावेळी तालुक्यात सर्वसमावेशक पाऊस झाला नव्हता़ अजूनही तालुक्यातील उजनी, मातोळा, आशिव, एकंबी परिसरात पावसाअभावी पेरण्या झालेल्या नाहीत़ ज्यानी पेरले त्यांचे उगवले पण आता पावसाअभावी ही कोवळी पिके कोमेजून जात आहेत़पेरण्यांना तब्बल महिनाभर उशिर झाल्यामुळे यावर्षी तालुक्यात ५० हजार हेक्टरपर्यंत सोयाबीनची पेरणी झाली़ कृषी विभागाने सोयाबीनचे घरगुती बियाणे पेरण्याचे आवाहन केले़ त्यानुसार ५० टक्के शेतकऱ्यांनी घरगुती तर ५० टक्के शेतकऱ्यांनी कंपन्याचे बियाणे पेरले़ यावर्षी सबंध तालुक्यात नामांकित कंपन्याचे बियाणे न उगवल्यामुळे तसेच घरचेही बियाणे काही प्रमाणात न उवगल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला़ तसेच दुबार पेरण्याही कराव्या लागल्या़ त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे़ उशिरा पडलेला पाऊस आणि दुबार कराव्या लागलेल्या पेरण्या यामुळे अजूनही तालुका कृषी विभागाकडे पेरणीचा अहवाल तयार झाल्याची शक्यता नाही़ तरीही सध्या तालुक्यात ८५ ते ९० हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत़ यामध्ये ५० हजार हेक्टरपर्यंत सोयाबीनची पेरणी झाल्याची शक्यता आहे़ तर ३५-४० हजार हेक्टरवर तूऱ, हायब्रीड, मका, मुग यासह अन्य पिकांची पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सुत्राने दिला़ तालुक्यात पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिकाची स्थिती चांगली आहे़ परंतू पावसाअभावी पिके मात्र कोमेजत आहेत़
पिके कोमेजली, पाणीटंचाई कायम
By admin | Updated: August 6, 2014 02:22 IST