परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात यंत्राद्वारे कापूस लागवड व वेचणीच्या प्रात्याक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेस्वरलू यांच्या हस्ते १२ आॅगस्ट रोजी झाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि मोसॅन्टो इंडिया लिमिटेड यांच्यात सार्वजनिक- खाजगी भागीदारीतून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. अशोक ढवण, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, गोळेगाव कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटी, मोसॅन्टो इंडिया लि. चे मुख्य ज्ञान विस्तारक डॉ. एस. एस. काजी यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. बी. व्यंकटेस्वरलू म्हणाले, कापूस वेचणी यंत्राबाबत शेतकऱ्यांकडून मोठी मागणी होत आहे. परंतु हे यांत्रिकीकरण शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पाहिजे. कापूस वेचणीसाठी शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात मजुरांची समस्या भेडसावत असून, वेचणीसाठी मोठा खर्च होत आहे. यंत्राद्वारे कापूस वेचणीत येणाऱ्या समस्यांचे निराकरण या प्रात्याक्षिकात व्हावे तसेच यातच संपूर्ण फर्टिइरिगेशनचाही समावेश असावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.संचालक संशोधन डॉ.दत्तप्रसाद वासकर म्हणाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कापूस लागवडीचे यांत्रिकीकरण प्रकल्प सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्त्वावर आधारित एकमेव विद्यापीठ असून, मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या प्रात्याक्षिकाची पाहणी करुन ऐच्छिकरित्या पुढे येऊन याबाबत प्रतिक्रिया द्यावी, म्हणजे या तंत्रज्ञानात अनुकूल बदल करता येईल. डॉ. एस. एस. काजी व न्यू हॉलंडचे अधिकारी अमित परदानिया यांनी उपस्थितांना प्रात्याक्षिकाची माहिती दिली.कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आनंद गोरे यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमास संशोधन उपसंचालक डॉ. जी. के. लोंढे, रानडे अॅग्रोचे विभागीय व्यवस्थापक ए. बी. सय्यद, नावेद शेख, आर. डी. भोरे आदींचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
विद्यापीठात यंत्राद्वारे कापूस लागवड प्रकल्प
By admin | Updated: August 15, 2014 00:03 IST