औरंगाबाद : कोरोनामुळे अनेक क्षेत्रांचे अर्थचक्र बदलले. उद्योग, व्यवसायाला फटका बसला. या सगळ्यातही औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने वर्षभरात दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे १०३ टक्के महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला. गेल्या वर्षभरात तब्बल १८५ कोटी रुपये आरटीओ कार्यालयाने जमा केले.
नव्या वाहनांची नोंदणी, पासिंग, लायसन्स यासह नियमांचे उल्लंघनप्रकरणी कारवाई, अशा विविधा माध्यमातून आरटीओ कार्यालयात शासकीय शुल्काची वसुली होते. कोरोनामुळे गतवर्षी लाॅकडाऊन पाळण्यात आले. कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले. नव्या वाहनांच्या खरेदीसह आरटीओ कार्यालयातील कामकाजावरही परिणाम झाला. या सगळ्यात आरटीओ कार्यालयाने नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले. कारवाईमुळे जप्त केलेली वाहने उभी करण्यासाठीही आरटीओ कार्यालयात जागा अपुरी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या सगळ्यामुळे कोरोना प्रादुर्भावातही आरटीओ कार्यालयाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा तीन टक्के अधिक महसूल गोळा केला. कार्यालयास १८१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यातुलनेत १८५ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.
कोरोनामुळे नवे उद्दिष्ट
आरटीओ कार्यालयास २०२० - २१ या वर्षासाठी २७६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे उद्दिष्ट ९५ कोटींनी कमी करण्यात आले आणि १८१ कोटींचे लक्ष्य देण्यात आले.