औरंगाबाद : खाम नदी स्वच्छता अभियानाचा पहिला टप्पा १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोमवारी दिले. सोमवारी सायंकाळी आयकर कार्यालयासमोर लोखंडी पुलाखाली सुरू असलेल्या नदीपात्राच्या स्वच्छतेची पाण्डेय यांनी पाहणी केली. यावेळी शहर अभियंता एस. डी. पानझडे, घनकचरा प्रमुख नंदकिशोर भोंबे, सीआरटी संस्थेच्या नताशा झरीन, व्हेरॉक इम्प्लॉय रिलेशन व्हाईस प्रेसिडन्ट सतीश मांडे, उपअभियंता यांत्रिकी डी. के. पंडित, आदी उपस्थित होते. १५ दिवसांत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यावर उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येईल, असे प्रशासक म्हणाले.
सद्य:स्थितीत बारापुल्ला गेट, गरमपानी, मकाई दरवाजा आणि बेगमपुरा या ठिकाणी खाम नदी स्वच्छ करण्यासाठी सहा जेसीबी आणि दोन पोकलॅनचा वापर करण्यात येत आहे.
प्रशासक यांनी पात्र स्वच्छतेसाठी दिले आदेश
-लोखंडी पुलाकडे येणारे पाणी सिद्धार्थ उद्यानाच्या पाठीमागे एसटीपी प्लांटच्या लाईनला वगळून पाण्याचा प्रवाह तिथेच थांबवावा.
-लोखंडी पुलाच्या खालून वाहणाऱ्या खाम नदीतील प्लास्टिक दोन जेसीबी आणि एक पोकलॅनच्या साहाय्याने सात दिवसांत काढणे.
- लोखंडी पुलाखाली अंदाजे तीन किलोमीटर क्षेत्रात खाम नदीच्या दोन्ही बाजूचे काठ स्ट्रीट फॉर पीपल या संकल्पनेनुसार सपाटीकरण करणे.
-तीन किलोमीटरचा पट्ट्यावर दोन्ही बाजूने नियोजनपूर्वक वृक्षारोपण करावे.
-सफाई दरम्यान नाल्यातून निघणाऱ्या दगडांचा वापर काठ सपाटीकरण किंवा पिचिंगसाठी करावा.
-खाम नदीवरील सर्व पुलांच्या दोन्ही बाजूने तार फेंसिंग करावी.
-नदीतून निघणारा कचरा, दगड, प्लास्टिकचा वापर काठावर फिलिंगसाठी वापरणे.