औरंगाबाद : पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे बारा दिवसांच्या रजेवर गेले आहेत. प्रभारी आयुक्तपदाची सूत्रे मुंबईतील ‘आयपीएस’ अधिकारी कुलवंतकुमार सरंगल यांनी सोमवारी स्वीकारली. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदावरून कुलवंतकुमार यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. मुंबईत त्यांची बदली झाल्यानंतर नाशिककरांनी आंदोलनही केले होते. कुलवंंतकुमार सरंगल हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. नाकाबंदीचे आदेश देऊन संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. अमितेशकुमार यांच्या गैरहजेरीत त्यांनी सुरूकेलेली हेल्मेट सक्ती, अॅपेरिक्षांविरुद्ध मोहीम यापुढेही सुरूठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील हे प्रशिक्षणानिमित्त महिनाभराच्या रजेवर असून, नांदेड परिक्षेत्राचे चिरंजीवप्रसाद यांच्याकडे त्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे, अशा परिस्थितीत औरंगाबादेत या दर्जाचा अधिकारी उपलब्ध नसल्याने मुंबईहून कुलवंतकुमार यांना तातडीने आणण्यात आल्याचे समजते.
पोलीस आयुक्त रजेवर; सरंगल यांच्याकडे पदभार
By admin | Updated: May 3, 2016 01:12 IST