जालना : माझ्यासारख्या एका छोट्याशा खेड्यातून, शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला भाजपाने कॅबिनेट मंत्री पदाच्या रुपाने मोठी जबाबदारी दिली. २९ वर्षे विरोधी पक्षात राहून संघर्षातच राहिल्यानंतर आता राज्याची सेवा करण्याची संधी मला जिल्ह्यातील जनतेच्या आशिर्वादामुळे मिळाली, असे सांगत जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व राजकीय मतभेद विसरून आपण एकत्र येऊ, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले. येथील वृंदावन गार्डनमध्ये संयोजन समितीच्या वतीने शनिवारी सायंकाळी झालेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना लोणीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे होते. यावेळी माजी पालकमंत्री आ. राजेश टोपे, माजी राज्यमंत्री आ. अर्जुनराव खोतकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, माजी आ. विलास खरात, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, राकाँचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, दिलीप तौर, सुरेश अग्रवाल, साईनाथ चिन्नादोरे, रमेशभाई पटेल, विनीत साहनी, ब्रिजमोहन लढ्ढा, उपसभापती रामेश्वर भांदरगे, रासपचे ओमप्रकाश चितळकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. पाणीपुरवठा मंत्री लोणीकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, राज्यात ऐन दुष्काळाच्या काळात पक्षाने माझ्यावर पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याची जबाबदारी सोपविली. दुष्काळाला सामोरे जाण्याचे आव्हान पेलण्यासाठी मला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मदतीची गरज पडणार आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याशिवाय आमचे सरकार स्वस्थ बसणार नाही. शेतकऱ्यांना पुन्हा ताठ मानाने चालता यावे, हाच राज्य सरकारचा प्रयत्न आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचीही मदत मिळते आहे. राज्यपातळीवर आपणही विविध प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही लोणीकर यांनी यावेळी दिली.आ. टोपे यांनी लोणीकर यांच्या रुपाने जिल्ह्याला पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आपण विकासाच्या कामात कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे आता विरोधी पक्षात असलो तरी विकासाच्या बाबतीत सरकारच्या पाठिशी राहू, चुकले तर विरोध करू, असे सांगितले. आ. खोतकर यांनी मुख्यमंत्री विधानसभेत बऱ्याचवेळा लोणीकर यांचे नाव घेतात, असे सांगून बबनराव हे तुम्हाला कसे जमते, असा सवाल केला. अनेक वर्षे सहकारी म्हणून सोबत राहिल्याने लोणीकर यांची मंत्रीपदी वर्णी झाल्याबद्दल खोतकर यांनी आनंद व्यक्त केला. माजी आ. गोरंट्याल यांनी जालना शहराच्या अंतर्गत जलवाहिनीसाठी १२८ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारने यापूर्वीच मंजूर केल्याचे सांगून हे काम तसेच भूमिगत गटार योजनेचे काम तातडीने व्हावे, अशी अपेक्षा आपल्या भाषणातून व्यक्त केली. जालन्याचे पाणी अंबडला देण्याबाबत गोरंट्याल यांनी विरोधही दर्शविला. अंबेकर यांनी लोणीकर यांच्या रुपाने जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याचा आनंद व्यक्त करून पाणीपुरवठ्यासारखे महत्वाचे खाते मिळाल्याने जिल्ह्यातील मोठे प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष घनश्याम गोयल व अध्यक्ष किशोर अग्रवाल यांनी केले. यावेळी विरेंद्र धोका, डॉ. संजय राख, सुरेंद्र पित्ती, सुनील रायठठ्ठा, विलास नाईक, डॉ. सुभाष अजमेरा, जगदीश नागरे, सागर बर्दापूरकर, नारायण पवार, सुनील आर्दड, राजेश सोनी, डी.बी. सोनी, अब्दूल हाफिज, राजेश राऊत, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, समीर खडकीकर, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, रविंद्र देशपांडे, शिवराज जाधव, पंकज कुलकर्णी, बंकट भोसले, वंदना कुलकर्णी, अरूणा जाधव, सखूबाई पानबिसरे, शकुंतला चौधरी, कमल तुल्ले, विजया बोरा, भावना मुळे, वैजयंती मद्दलवार आदी होते.४यावेळी केंद्रीय राज्यमंत्री दानवे आपल्या भाषणात म्हणाले, निवडणुकीचे वातावरण विसरून आता आपण जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला पाहिजे. विरोधी पक्षाने आमच्या सरकारचे चुकले तर आंदोलने जरूर करावीत, परंतु ते वळणी पडण्यास तुम्हाला वेळ लागेल, असा टोमणा दानवे यांनी टोपेंकडे पाहून मारला. केंद्रातून जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी आणणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. बबनराव हे राजकारणात संघर्षातूनच पुढे आले, त्यांना जनतेचे प्रश्न चांगल्या रितीने माहिती आहेत. त्यामुळे ते आपली कारकीर्द यशस्वीपणे सांभाळतील, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.
विकासासाठी एकत्र येऊ-लोणीकर
By admin | Updated: December 14, 2014 00:05 IST