औरंगाबाद : नवरात्राच्या नऊ दिवसांपैकी आजची सहावी माळ राजकीय वर्तुळात लक्षात राहणारी ठरली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे या प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार विधानसभा निवडणूक मैदानात आणल्यामुळे एकगठ्ठा मतांच्या राजकारणाला सुरुंग लागला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली, तर थोड्याफार मतांचा फायदा होईल. या अनुषंगाने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी खऱ्या अर्थाने नवरात्रात जागरण केले. माघार घेण्यासाठी ३० सप्टेंबरच्या रात्रभर उमेदवारांच्या मागे अक्षरश: धावाधाव सुरू होती. १ आॅक्टोबर हा दिवस उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सहाव्या माळेच्या रात्रीत ज्यांना महालक्ष्मी प्रसन्न झाली, ते बुधवारी अर्ज मागे घेतील, असाच त्याचा सरळसरळ अर्थ होईल. तो अपक्ष उमेदवार याच्या संपर्कात आहे, तर तो उमेदवार अमुकअमुक उमेदवाराच्या संपर्कात आहे. फलाणा उमेदवार त्यांच्या घरी आहे. याची त्यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे. त्यांची बोलणी फिसकटली आहे. त्याला तर साहेबांचा फोन आला होता म्हणे, या व अशा खमंग, रंगतदार चर्चा बहुतांश सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यालयात आज सुरू होत्या. अपक्ष, बंडखोर, विशिष्ट समाजाच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीतून उद्या १ आॅक्टोबर रोजी माघार घ्यावी, यासाठी आज रात्रभर शहराबाहेर ‘ऊठबशी’चे राजकारण सुरू होते. लग्नाच्या देवाण-घेवाणीवरून होणाऱ्या बैठकीत जसे रुसवे-फुगवे होतात, त्याप्रमाणे ‘वर’ पक्षाच्या भूमिकेत असलेल्या अपक्ष उमेदवारांनी अनेक उमेदवारांना कात्रीत पकडले होते. आगामी पालिका निवडणुकीत नगरसेवकपद देण्याचा शब्दही अनेकांना देण्यात आला. पहाटेपर्यंत बंडोबांना थंड करण्यासाठी या ना त्या मध्यस्थामार्फत प्रयत्न सुरू होते. नऊ मतदारसंघांत कोणाच्या गळाला किती मासे लागले. याचे उत्तर १ आॅक्टोबर रोजी मिळणार आहे.
माघारीसाठी रात्रभर मनधरणी
By admin | Updated: October 1, 2014 00:40 IST