तरीही सिटी बस लातूरकरांच्या सेवेत धावलेली नाही़ निविदा प्रक्रियेतच सिटी बसचा प्रकल्प अडकला आहे़ ९० टक्के केंद्र व १० टक्के राज्य शासनाच्या ३६ कोटी ८९ लाखांच्या मदतीने सिटी बसचा महत्वकांक्षी प्रकल्प आतापर्यंत सेवेत यायला हवा होता़ मात्र स्थानिक प्रक्रिया पूर्ण करण्यास मनपाला वेळ मिळाला नाही़ रंग आणि लोगो न कळविल्याच्या चिल्लर कारणांमुळे सिटी बसला मुहूर्त लागेना झाला आहे. यासाठी समिती नेमली पण तीन महिन्यांपासून मनपाच्या या समितीला बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही़ परिणामी, बसचा पुरवठा रखडला आहे.
३१ डिसेंबर २०१३ रोजी लातूर मनपाला केंद्र शासनाकडून सिटी बसचा प्रकल्प मंजूर झाला़ त्यावेळी लातूर शहरात नव्या वर्षाची नवी भेट म्हणून मोठमोठ्या होर्डिंग मनपाने लावल्या होत्या़ आमदार, महापौरांसह आयुक्तांचे छायाचित्र असलेल्या या कटआऊटवर लातूरकरांना सिटी बसची नवी भेट म्हणून गाजावाजा केला गेला़ आज त्याला पावणेदोन वर्षांचा कालावधी उलटला, मात्र ही भेट लातूरकरांना अद्याप मिळाली नाही़ निविदा प्रक्रियेद्वारे सिटी बस खरेदीचे टेंडर पास झाले आहे़ पहिल्या टप्प्यात ३० सिटी बस खरेदीला मनपाने मंजुरी दिली़ अशोक लिलॅन्ड, टाटा मोटार्स आणि अॅलो या कंपनीला ही निविदा पास झाली. संबंधीत कंपनीने सिटी बस खरेदी केल्या़ कंपनीने सिटी बसला कोणता रंग असावा, त्यावर कुठला लोगो असावा, यासंदर्भात मनपाकडून माहिती मागविली़ या बाबीलाही तीन महिने उलटले़ अद्याप रंगसंगती व लोगोबाबत मनपाने संबंधीत कंपनीला माहिती कळविली नाही़ बसची रंगसंगती कोणती असावी, यासंदर्भात महापौरांनी १३ नगरसेवकांची एक समिती गठीत केली आहे़ समिती सदस्यांना रंग कळविण्याबाबत लेखी माहिती मागितली आहे़ मात्र सदस्यांनी बैठक घेऊन चर्चेद्वारे रंग फायनल करावा, असे मत नोंदविले आहे़ परंतु समिती सदस्यांची रंगसंगती ठरविण्यासाठी बैठकच झाली नाही़ त्यामुळे सिटी बस पुरवठाधारक कंपन्यांकडेच आहेत़ रंगसंगती व लोगो फायनल करण्यासाठी मनपात अद्याप एकमत झाले नाही़ त्यामुळे बसेस आलेल्या नाहीत़ सिटी बसची सेवा देण्यासाठी वाहक, चालक, दुरुस्ती, देखभाल या बाबींचेही टेंडर निघणार आहे़ त्यालाही मुहूर्त लागलेला नाही़ चालकांचे डेंटर वेगळे असणार आहे़ वाहकांचेही टेंडर वेगळेच असेल़ परंतु या टेंडरबाबत मनपाच्या अद्याप हलचाली नाहीत़ त्यामुळे हा मोठा प्रकल्प परत जाण्याची भिती आहे़ महापौरांना गांभीर्य नाही, त्यामुळे आयुक्तही गांभीर्याने घेत नाहीत़ केवळ आणि केवळ निविदा प्रक्रियेत हा प्रकल्प आहे़ सेवेत कधी येईल, याची खात्री ना आयुक्त देतात ना महापौऱ सिटी बसची योजना तोट्यात निघेल अशी शंका महानगरपालिकेला सुरुवातीपासूनच आहे़ त्यामुळे मनपाने ६० ऐवजी ३० बसेसच्या टेंडरला मान्यता दिली़ अशा अनेक अडचणीत सिटी बसचा प्रकल्प अडकला आहे़ या अडचणी सोडविण्यासाठी सध्यातरी मनपाला अपयशच आहे. सिटी बसची योजना दोन वर्षांपासून रखडली आहे़ त्याला सत्ताधारी आणि अधिकारी कारणीभूत आहेत़ कंपनीला बसचा रंग कळविण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी गेला आहे़ तरीही रंग कळविण्यात आला नाही़ या समितीची बैठकच झाली नाही़ सदस्यांनी पत्राद्वारे रंग कळविणे बेकायदेशीर आहे, असे नगरसेवक शैलेश स्वामी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ सिटी बस प्रवाशांच्या दिमतीला आल्यानंतर तांत्रिक देखभाल करण्याचे नियोजन या प्रकल्पात आहे़ आयटीएस सॉफ्टवेअर विकसीत करुन रस्त्यावर धावत असलेल्या बसेसचे नियंत्रण करणे तांत्रिक देखभालीत आहे़ मात्र ही निवीदाही निघालेली नाही़ ती काढण्यासाठी मनपा बेफिकीर आहे़ वाहनतळाची निश्चिती नाही, मार्ग निश्चिती नाही, थांबे निश्चित नाहीत, केंद्रीय बसस्थानकाची निश्चिती नाही, शहर बसस्थानक नाही, वर्कशॉप नाही, या सर्व बबींची पूर्तता कधी होणार आणि सिटी बस कधी धावणार हे कुणीही निश्चित सांगू शकत नाही़ दीड वर्षांपूर्वीची योजना असल्यामुळे आता त्यात २० टक्के तूट होऊ शकते़ ३६ कोटी ८९ लाखांच्या या योजनेत सध्याच्या खर्चानुसार २० टक्के वाढ केली तर याची रक्कम वाढते़ त्यामुळे पुरवठाधारक कंपनी रक्कम वाढवून मागू शकते़