बीड : येथील सेतू सुविधा केंद्राला दलालांचा विळखा असल्याची ओरड जिल्हाधिकाऱ्यापर्यंत गेल्यानंतर दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच सेतू सुविधा केंद्रात अचानक ‘एन्ट्री’ केली. यावेळी काही कडबोळे घेऊन बसलेले ‘दलाल’ जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. जिल्हाधिकाऱ्यांना पाहताच त्यांची बोबडी वळली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सेतू सेविधा केंद्र आहे. येथे काही दलाल असून ते येथे येणारे ग्रामस्थ, विद्यार्थी यांना विविध प्रमाणपत्रे तात्काळ काढून देण्याची थाप मारून त्यांच्याकडून पैसे उकळतात. दलालांशिवाय येथे काम होत नाही, नाही तर ‘सरकारी काम नि सहा महिने थांब’ अशी येथील अवस्था झाली होती. जे काम दलालांकरवी येते, त्याच फायली ‘पुटअप’ होतात व अशाच फायली निकाली काढल्या जातात, अशी ओरड गेल्या काही दिवसांपासून होत होती. येथील असा प्रकार वाढल्याने शेवटी हे प्रकरण जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे असाच प्रकार गेल्या दोन महिन्यापूर्वीही होता. त्यावेळीही जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयास अचानक भेट देऊन सूचना दिल्या होत्या. यानंतरही दलालांनी आता पुन्हा बस्तान बसविले होते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास सेतू कार्यालयास भेट दिली. यावेळी दलाल तेथे हजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एका दलालास ‘येथे काय करता’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, ‘माझ्या मुलीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढावयाचे आहे.’ जिल्हाधिकारी सेतूमध्ये गेल्याचे समजताच निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी सोरमारे, तहसीलदार ज्योती पवार यांनीही तेथे धाव घेतली़दलालांवर गुन्हा दाखल करा, असे आरडीसी निऱ्हाळे यांनी सेतूचालकास बजावले. नाहीतर तुमच्यावरही कारवाई करू, असे त्यांनी तडक बजावले. यानंतर सेतू कार्यालयात शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि. धरमसिंह चव्हाण हेही दाखल झाले होते. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईने दलालांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांकडून 'सेतू'चा पंचनामा
By admin | Updated: July 8, 2014 00:57 IST