केळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगाव, आधरवाडी, कोल्हाळा, तांडा, पिंपळगाव घाट परिसरात दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगाम तर गेला आता रबीवरही आलेले संकटही तोंडचा घास हिसकावून घेतो की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ढगाळ वातावरणात सुटलेला गारवा हा रबी पिकांसाठी धोकादायक ठरत आहे. कारण अचानक सुरू होत असलेला रिमझिम पाऊस तर काही वेळा झालेला अवकाळी पाऊस पिकांच्या मुळावर येऊन बसला आहे. पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने रबी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदे या पिकांवर मोठ्या प्रमाणावर मवा, तुडतुडा व तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले
ढगाळ वातावरणात दिवसभर गारवा निर्माण झाल्याने सर्वत्र हुडहुडीचे वातावरण आहे. त्यामुळे केळगाव परिसरातील विविध गावांत सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत.
फोटो
: सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील ज्वारी पीक बहरले असून दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हे पीक धोक्यात आले आहे.