वाढवणा बु़ : गावात अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ मद्यपींमुळे ये- जा करणाऱ्या महिला, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ पोलिसांनी याकडे लक्ष देऊन ही अवैध दारुविक्री बंद करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़ उदगीर तालुक्यातील वाढवणा बु़ येथे जिल्हा परिषद मुलांची प्रशाला आहे़ प्रशालेत पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात़ याच प्रशालेच्या बाजुला जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक शाळा आहे़ येथे पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात़ या परिसरात दोन अंगणवाड्या आहेत़ त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांची नेहमी रेलचेल असते़ परंतु, या भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे़त्यामुळे मद्यपींचा सतत वावर असतो़ हे मद्यपी दिवसभर दारुच्या नशेत तर्रर असतात़ मद्याच्या धुंदीच्या अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन ये- जा करणाऱ्या महिला, विद्यार्थ्यांना अपमानित करीत असतात़ त्यामुळे ये- जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे़ दिवसभर या भागात गोंधळ असल्याने शैक्षणिक कार्यातही व्यत्यय येत असल्याचे पहावयास मिळत आहे़ पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या अवैध धंद्यांत वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ अवैैघ दारू विक्रीमुळे गावात तंट्याचे प्रमाण वाढले आहे़ परिणामी सतत गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन शांतता भंग होत आहे़ मद्यपी महिलांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे दिसून येत आहे़ हे अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी गावकऱ्यांनी वारंवार करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ (वार्ताहर)गावात अवैध धंदे वाढले आहेत़ ते बंद करण्यासाठी येत्या दोन दिवसांत मोहीम उघडण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव राख यांनी सांगितले़
मद्यपींच्या त्रासामुळे नागरिक हैराण
By admin | Updated: July 28, 2014 00:54 IST