ऑनलाईन लोकमत / संतोष हिरेमठ
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील ड्रेनेजलाइनला जवळपास ६० वर्षे उलटून गेली आहेत. गेली अनेक वर्षे ड्रेनेजलाइनची नुसती थातुरमातुर दुरुस्ती करण्यावरच भर देण्यात आला. यामुळे अनेक इमारतींच्या ड्रेनेजलाइन वारंवार नादुरुस्त होऊन सांडपाणी उघड्यावर वाहते. स्वच्छतागृह तुंबल्यामुळे नाक मुठीत धरून रुग्ण-नातेवाईक आणि डॉक्टरांना वावरावे लागते. या ड्रेनेजलाइनच्या समस्यांनी घाटी रुग्णालयच ‘चोकअप’ झाल्याचे दिसते.
घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह लगतच्या भागातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. एकट्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १,५०० ते २,००० रुग्ण येतात. प्रत्येक रुग्णासोबत किमान एक नातेवाइक असतो. ही संख्या पाहता स्वच्छतागृहाची पुरेशी आणि चांगली सुविधा देण्याची आवश्यकता आहे; परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. घाटी रुग्णालयातील अपघात विभागासह परिसरात ठिकठिकाणी सांडपाण्याची डबकी साचलेली आहेत. ठिकठिकाणी इमारतींवरील फुटलेल्या पाइप, चेंबरमधून उघड्यावर पाणी वाहताना दिसते.
मेडिसीन विभागातील स्वच्छतागृहाची तर अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. अशीच काहीशी अवस्था प्रत्येक स्वच्छतागृहाची दिसून येते. काही ठिकाणी स्वच्छतागृह ब्लॉक आहेत, तर काही ठिकाणी व्यवस्थित स्वच्छताच होत नसल्याचे दिसते. पान, तंबाखूच्या पिचका-यांनी स्वच्छतागृहांच्या भिंती रंगलेल्या आहेत. स्वच्छतागृहातील नळाला पाणी नाही आणि बाहेर पाणी तुंबलेले, अशी वाईट अवस्था आहे. त्यामुळे घाणीच्या साम्राज्यामुळे स्वच्छतागृहात पाय ठेवण्याचे धाडस होत नाही. रुग्णालय परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहातही स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहातील वॉश बेसिनही गायब झालेले आहे. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची कुंचबणा होत आहे. महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहातही अशीच दुरवस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही गैरसोयीला तोंड द्यावे लागते.
एकमेकांकडे बोटघाटीतील स्वच्छतागृहांतील समस्या कोणी दूर करायची, यावरून अनेकदा घाटी आणि बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवितात. त्यामुळे महिनोन्महिने अनेक प्रश्न ‘जैसे थे’ राहतात.
रुग्णालय परिसरात ‘लोटा’एकीकडे शासनाकडून हगणदारीमुक्तीसाठी प्रयत्न केला जात आहे; परंतु घाटी रुग्णालयाच्या परिसरातच लोट्याचा वापर सुरू असल्याने त्यास खोडा बसत आहे. घाटीत येणारे बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील असतात. बाहेरगावचे रुग्ण सकाळीच ओपीडीत येतात. सर्व तपासण्या, उपचार पूर्ण होईपर्यंत त्यांना घाटी परिसरात राहावे लागते. अशावेळी स्वच्छतागृहाचा वापर करण्याची वेळ येते; परंतु स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेमुळे अनेक जण उघड्यावरच जातात. त्यामुळे परिसराच्या अस्वच्छतेत भर पडत आहे.
शासनास प्रस्तावस्वच्छतागृहाचे नळ, दरवाजे, लिकेज, असे ८० टक्के समस्यांचे निराकरण झालेले आहे. नातेवाईक उघड्यावरच अन्नपदार्थ फेकतात. परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने दुर्गंधी पसरते. घाटीतील संपूर्ण ड्रेनेजलाइन बदलण्यासाठी ३.२४ कोटींचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला आहे. -के.एम. सय्यद,सहायक अभियंता, बांधकाम विभाग, घाटी
डिसेंबरपर्यंत बदलघाटी रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची भरती केली जाणार आहे. ही भरती झाल्यानंतर रुग्णालयात अनेक सुधारणा होतील. ड्रेनेजलाइनचा प्रश्न डिसेंबरपर्यंत सुटेल. -डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी