औरंगाबाद : मराठवाड्यावर सतत अन्याय होतो आहे. विधान परिषदेसाठी मराठवाड्यातून एकही लायक व्यक्ती दिसली नाही का? असा प्रश्न उपस्थित करीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी खा. उत्तमसिंह पवार यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. उत्तमसिंह पवार यांनी बुधवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षावर टीकेचा भडिमार केला. मराठवाड्याचा अनुशेष सर्वच बाबीत शिल्लक आहे. मराठवाड्याला प्रतिनिधित्व देण्यातही ही मंडळी भेदाभेद करीत असल्याचे सांगून ते म्हणाले की, विधान परिषदेवर मराठवाड्यातून एकाही व्यक्तीला संधी देण्यात आली नाही. यासंदर्भात मी प्रदेशाध्यक्षांकडे विचारणा केली होती; परंतु त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री खोटे आहेत, असे सांगून पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून त्यांनी मला विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्यांनी ते पाळले नाही. मराठवाडा विकासाचे त्यांना भान नाही. मराठवाड्यावर यापुढेही असा अन्याय झाल्यास मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या गाड्या अडविल्या जातील. पक्षात राहूनच आपण पक्षातील अन्यायाविरुद्ध लढणार असल्याचेही ते म्हणाले. घटस्फोटितेसोबत लग्न नसतेकाँग्रेस पक्षश्रेष्ठींवर आरोप केल्यानंतर तुम्हाला पक्षातून काढून टाकतील, तुम्ही पुन्हा भाजपामध्ये जाणार का, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता पवार म्हणाले की, घटस्फोट घेतलेल्या बाईसोबत पुन्हा लग्न करायचे नसते, एवढे मला कळते.
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा
By admin | Updated: June 19, 2014 00:52 IST