जालना : जिल्हा परिषदेत वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रलंबित प्रकरणे १० जानेवारीपर्यंत मार्गी लावण्याचे आश्वासन सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांनी मंगळवारी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळास दिले. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सीईओ देशभ्रतार यांची भेट घेऊन विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्यासमवेत चर्चा केली. ज्या उमेदवारांची सरळ सेवेने रिक्त पदी निवड झाली आहे, अशा उमेदवारांना तात्काळ आदेश निगर्मित करण्याचे यावेळी ठरले. तसेच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ पात्र कर्मचाऱ्यांना वेळीच देण्याचेही ठरले, असे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. वर्ग ३ व ४ च्या कर्मचारी यांच्या सेवापुस्तिका अद्ययावत करणे, मागासवर्गीय कक्ष त्वरीत सुरू करणे, संघटनेस जि.प. आवारात कार्यालय देणे, कर्मचाऱ्यांकरीता बंद असलेला वार्षिक क्रीडा महोत्सव फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात घेणे, महिला कर्मचाऱ्यांसाठी भोजन कक्ष व स्वच्छतागृहाची तात्काळ व्यवस्था करणे इत्यादी मुद्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीस महासंघाचे सचिव संतपराव साळवे, सुनील गंगावणे, सुमन बोकन, दीपक म्यात्रेकर, विजय खरात, हेमंत खरात, पंकज वाघमारे, नायबा पाडेवार, नितीन लोखंडे, नितेश प्रधान, सिद्धार्थ वाहुळे, भालेराव, बावीस्कर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रलंबित पदोन्नतीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावणार
By admin | Updated: January 8, 2015 00:56 IST