सितम सोनवणे, लातूरपहाटेच्या वेळी पक्ष्यांच्या किलबिलाटात लातूरचे मध्यवर्ती बसस्थानक मात्र निद्रिस्तच दिसले़ पंढरीची वारी करुन आलेल्या वारकऱ्यांना गावाकडे जाण्यासाठी पहाट उजाडण्याची वाट पहावी लागली़ बसस्थानक म्हटले की, नेहमीच प्रवाशांची गर्दी, गोंगाट, बसगाड्यांची रेलचेल, धावपळ दिसून येते़ पहाटेच्या वेळी मात्र बसस्थानकाचा नुर निराळाच दिसला़ मध्यवर्ती बसस्थानकातील गुलमोहराच्या झाडावर रविवारी पहाटे ३़५० वाजता पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता़ भुकेच्या जाणिवेने पक्षी जागे होत होते़ बसस्थानकातील फलाट क्रमांक ५ वर नगर, पंढरपूर बस येऊन प्रवासी उतरुन बसस्थानकात बसण्यासाठी जागा शोधत होते़ बसचालक, वाहक बसमध्येच विसावले़ बसस्थानकावर नेहमीच बसचा गोंगाट व प्रवाशांची गर्दी व गोंगाट असणारे बसस्थानक मात्र चिडीचूप होते़ आषाढीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणारे प्रवासी मिळेल तिथे जागा करुन आडवे होत होते़ वाहतूक नियंत्रण कक्षात व्ही़ व्ही. साबळे कर्तव्यावर होते़ बसस्थानकात प्रवाशासोबतच २५ बसही शांत विसावा घेत उभ्या होत्या़ घडीचा काटा जसजसा पुढे सरकत होता, तसा पक्ष्यांचा किलबिलाट हळुहळू वाढत होता़बसस्थानकाच्या गेटवर तीन-चार आॅटो प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभे होते़ समोर एक इडलीचा गाडा, त्यावर परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी प्रवासी रात्री उशिरा आल्याने सकाळ होण्याच्या प्रतीक्षेत गरम ईडली, गरम चहाचा आस्वाद घेत एकमेकांना कुठे सेंटर आले हे विचारत होते़ पेपरचे गठ्ठे टाकणाऱ्या गाड्या उदगीर...उदगीर... म्हणून प्रवाशांसाठी ओरडत होते़ आपल्याही गाड्याकडे ग्राहक यावा, यासाठी चाँद हा मोठ मोठ्याने गरम पोहे, चाय गरम... म्हणून ओरडत होता़ पहाटे ४़३० च्या सुमारास फलाट क्रमांक २ वर लातूर-औरंगाबाद ही बस औरंगाबादला जाण्यासाठी लागली होती़ औरंगाबादला जाणारे प्रवासी त्या बसमध्ये जाऊन बसले़ बसस्थानक हळूहळू जागे होत होते़ मध्येच एखादी बस येत़ प्रवासी उतरत घडीकडे बघत स्थानकात थांबत तर काही प्रवासी आपल्या कुटुंबियांसह आॅटोकडे जात. आॅटोचे भाडे ठरवून आॅटोत बसून घराकडे निघून जात होते़ दरम्यान झोपेतून उठलेले प्रवासी जांभई देत पाण्याच्या टाकीकडे वळत. नळ्याच्या पाण्याने चूळ भरुन तिथेच पिचकारी मारत. पुढे प्रसाधनगृहाकडे वळत होते़ बसस्थानकात विसावलेले प्रवासी व जनावरे गाड्याच्या आवाजाने उठू लागले होते़ त्यात मोकाट गाढवही मुक्तपणे ओरडत एकमेकांच्या मागे धावत होते़ हॅलोजन दिव्याचा झगमगाट थंड वाऱ्याची अधूनमधून येणारी झुळूक, विठ्ठलाच्या दर्शनाने तृप्त झालेले वारकरी गाढ झोपेत होते़ तर काही वारकरी विठ्ठल नामाचा जप करीत बसले होते़ मध्येच काही प्रवासी चौैकशीसाठी वाहतूक नियंत्रण कक्षाकडे चौकशी करत़ हे पाहून वाहतूक नियंत्रकांनी ‘कोणती गाडी कुठे लागणार’ याची रेकॉर्डिंग टेप अधूनमधून वाजवण्यास सुरुवात केली़हिरकणी कक्ष व पोलिस चौकी दोन्ही रिकाम्याच होत्या़ पण त्याचवेळी महिला पोलिस उपनिरीक्षक मुंडे या बसस्थानकावर फिरत होत्या. त्या म्हणाल्या, दोन कॉन्स्टेबल साध्या वेशात फिरत असतात़ प्रवाशांची सुरक्षितता, त्यांच्या सामानांची देखरेख केली जाते. स्थानकावरील पेपरचे गठ्ठे मोजून घेण्याचे काम चंद्रकांत गड्डे करीत होते़ वेगवेगळे वृत्तपत्रांचे गठ्ठे लावण्यात ते मग्न होते़ स्थानकातील पेपर स्टॉलपुढेही वृत्तपत्राचे गठ्ठे साखरे आणून टाकत होते़ उपहारगृह उघडताच प्रवाशांची लगबग...नांदेड, हिंगोली येथून परीक्षेसाठी आलेले प्रवासी बालाजी पिंपरे, गजानन वाघमारे, नागनाथ एमेकर आपल्या परीक्षा केंद्राबाबतची माहिती एकमेकांना विचारत होते़ ५़२० वाजता लातूर-औरंगाबाद फलाट क्रमांक २ वर लागली़ बाजूला असणारे उपहारगृह उघडले होते़ चहाची लगबग, प्रवाशांची धावपळ, पक्ष्यांचा किलबिलाट सोबत बसस्थानकात प्रवाशांची गडबड, धावपळ गाड्यांची घरघर वाढली होती़
पक्ष्यांच्या किलबिलाटात बसस्थानक निद्रिस्तच
By admin | Updated: July 14, 2014 01:00 IST