संजय तिपाले ,बीडज्या वयात शिक्षण घ्यायचे, स्वत:चे आयुष्य घडवायचे त्याच वयात ऊसतोडणीसाठी हजारो मुलामुलींच्या खांद्यावर संसाराचे ओझे पडते़ अंगावरील हळद अन् हातावरील मेहंदी पुसण्याआधीच सुखी संसाराची स्वप्ने उराशी घेऊन नव्या जोडप्यांना कोयता उचलावा लागतो़ कमी वयात विवाह झाल्याने माता व बालकांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच शिवाय काहीवेळा गुंतागुंत वाढून जीवही गमवावा लागतो़ जिल्ह्यात अल्पविवाहाचे प्रमाण ३६ टक्के इतके असून माता व अर्भकमृत्यूची आकडेवारीही चिंताजनक आहे़ऊसतोड कामागारांच्या बीड जिल्ह्यात सहा महिन्यांसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांना कोयत्याप्रमाणे उचल दिली जाते़ पती- पत्नीचा मिळून एक कोयता असे ढोबळ गणित मांडून मजूर ऊसतोडणीचे काम करतात़ उचलीसाठी कोयत्याचा ‘कोरम’ पूर्ण व्हावा, यासाठी मजूर कुटुंबिय मुलामुलींची लग्ने अल्पवयातच उरकतात़ कमी वयात संसाराचे ओझे पेलवताना जोडप्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो़ मुलांपेक्षा मुलींचे कमी वयात विवाह होण्याचे प्रमाण अधिक आहे़ जिल्ह्यात शंभरपैकी ३६ मुलींचे विवाह १८ वर्षाच्या आत होतात़ राज्याचे प्रमाण १८ टक्के इतके असून त्यापेक्षा दुप्पट प्रमाण हे एकट्या बीड जिल्ह्याचे आहे़ स्थानिक ठिकाणीच रोजगार हवाबालविवाहांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी ऊसतोडीचा कलंक पुसून स्थानिक पातळीवर छोट्या उद्योगांची भरभराट होणे गरजेचे आहे़ मागेल त्याला काम अशी घोषणा करत शासनाने रोजगाराच्या हमीची योजना आणली;परंतु तरीही सहा लाखांवर मजुरांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते ही लाजिरवाणी बाब आहे़ श्रमशक्ती येथेच राहिली तर जिल्ह्याच्या विकासालाही गती येईल़ बालविवाह थांबविण्याचे काम प्रशासनाचे असले तरी त्यासाठी सामाजिक व आर्थिक स्थैर्य देखील आवश्यक आहे़ जोपर्यंत स्थलांतर थांबत नाही तोपर्यंत बालविवाहांसारख्या प्रथांना शंभर टक्के रोख लावणे सोपे नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली़
ऊसतोडीसाठी अल्पवयातच संसाराचे ओझे खांद्यावर !
By admin | Updated: October 29, 2014 00:46 IST