जालना : बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे ५ आॅगस्ट २०१४ रोजी अमोल राजेश लोळगे यांची सराफा पेढी फोडून चोरलेले ५ लाख ९७ हजार ५०० रूपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले होते. हे दागिने व चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांना खबऱ्याने सदर चोरी संदर्भात माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने पंकज सुभाष सोनवणे व संदीप संजय सोनवणे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी या आरोपींनी लोळगे यांची सराफा पेढी फोडून तिजोरीतून २०० ग्रॅम सोन्याचे दागिने व दीड किलो चांदीचे दागिने पळवून नेल्याची कबूली दिली. २ लाख २५ हजार रूपयांचा ऐवज पोलिसांना काढून दिला. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही कारवाई देशपांडे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक पंकज जाधव, जमादार निवृत्ती कोरडे, सांडूजी शिवणकर, मदन काळे, सुभाष चव्हाण, शेख जावेद, बाबासाहेब गायकवाड, चतुरसिंग बमनावत यांनी केली. (प्रतिनिधी)
सराफा पेढी फोडणारे जेरबंद
By admin | Updated: September 17, 2014 01:11 IST