जालना : जुना जालना भागातील मोती तलावात नौकाविहार सुरु करण्याचा पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. जालना ते मंठा या वळण रस्त्यावरील विस्तीर्ण जागेवर मोती तलाव पसरले आहे. या तलावाने शहराचे सौंदर्य वाढविले आहे. विशेषत: पावसाळ्यात हा तलाव तुडुंब भरल्यानंतर तलावास पर्यटन स्थळाचे स्वरुप प्राप्त होत आले आहे. प्रत्येक उन्हाळ्यात या तलाव परिसरात दररोज हजारो नागरिक आवर्जून हजेरी लावत आले आहेत. तलावाजवळील राजे संभाजी उद्यान व या तलाव परिसरात सायंकाळच्या वेळी चिमुकल्यांपासून महिला अबालवृद्ध विरंगुळा व विसाव्यास मोठ्या संख्येने येत आले आहेत.पालिका प्रशासनाने सुद्धा या परिसराचे महत्व ओळखून खाद्यपदार्थ विके्रत्यांना उद्यानाजवळ, तलावालगत खास जागा उपलब्ध करुन दिली. स्टॉल्सचे बांधकामही करुन दिले. परिणामी किमान डझनभर खाद्य पदार्थ विक्रेत्यांना दिलासा मिळाला. काही कुटुबियांना रोजगार सुद्धा मिळाला. या पार्श्वभूमीवरच आता उद्यानापासून ते एमआयडीसीपर्यंत लांब पसरलेल्या या तलावात सर्वसामान्य नागरिकांसाठी नौका विहार सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या विषयाच्या अनुषंगाने गेल्या काही महिन्यांपासून पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी दीर्घकाळ विचारमंथन केले. तज्ज्ञांमार्फत मते मागविली. व नौकायाना संदर्भातचा प्रस्ताव तयार केला. आता त्यास पालिकेच्या सर्वसाधारण सभेने आठ जुलै रोजी मंजुरी दिली असून, त्यानुसार आता या प्रस्तावास मूर्त स्वरुप यावे, म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. सोलापूर व कोल्हापूर येथील रंकाळा तलावाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील मोती तलावातील नौकाविहाराचा प्रकल्प यशस्वीरित्या राबविला जावा म्हणून पालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. या दृष्टिकोनातून त्या आराखड्यातील बारकावे हे तपासले जाणार आहेत. या प्रकल्पांत कोणतीही त्रुटी राहू नये हा प्रकल्प अधिकाधिक यशस्वी व्हावा म्हणून प्रशासनाने सर्वाेतोपरी विचार विनिमय सुरु केला आहे. (प्रतिनिधी)खर्च व उत्पन्नाचा मेळ बसविण्याचा प्रयत्नपालिका प्रशासनाने हे नौकायान स्वत: किंवा खाजगी एजन्सीमार्फत सुरु करावे या संदर्भात विचारविनियम सुरु केला असून, या नौकायानाचा खर्च, त्यातून मिळणारे उत्पन्न देखभाल दुरुस्ती याचा मेळ बसविण्याचे कामही सुरु केले आहे. त्यामुळे यास लवकरच मुहूर्त लागेल, असा अंदाज आहे.
मोती तलावात होणार नौकाविहार
By admin | Updated: July 13, 2014 00:19 IST