विकास राऊत , औरंगाबादसर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत शहरातील बहुतांश कार डेकोरेशन मार्केटमध्ये ब्लॅक फिल्मची सर्रासपणे विक्री सुरू आहे. यातून शासकीय वाहनेदेखील सुटलेली नाहीत. ब्लॅक फिल्मचा बिनबोभाट वापर सुरू असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. ब्लॅक फिल्मच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी असतानाही हा सगळा काळाबाजार पोलिसांच्या समक्ष सुरू आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. मे २०१२ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चारचाकी वाहनांच्या काचांवर ब्लॅक फिल्म लावणे गुन्हा आहे. न्यायालयाच्या आदेशातील परिच्छेद २७ नुसार पोलिसांनी याची अंमलबजावणी व त्यानुसार कारवाई करणे अपेक्षित आहे. विक्री आणि उत्पादन या दोन्हींवर बंधने आहेत. असे असताना हा काळाबाजार सुरू आहे. मे २०१२ मध्ये न्यायालयाने आदेश दिले असताना बहुतांश कार डेकोरेशनच्या दुकानांमध्ये जुलै २०१४ मध्ये उत्पादित झालेल्या ब्लॅक फिल्मचे रोल आहेत. एका रोलची किंमत १,८०० रुपये असून ५२८.२ सें.मी. बाय ५.८ सें.मी. असा त्या रोलचा आकार आहे. कारच्या काचांना काळी फिल्म लावणाऱ्यांमध्ये शासकीय, पोलीस आणि राजकीय नेत्यांच्या वाहनांचा अधिक भरणा असल्याचे दिसून आले आहे. ‘ग्रे’ऐवजी पूर्ण ब्लॅक फिल्म वापरण्यात ही मंडळी आघाडीवर आहे. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या जीपला पूर्ण काळ्या रंगाची फिल्म लावलेली होती. पोलिसांची गस्त घालणारी टाटासुमोदेखील तशी होती. काही राजकीय नेत्यांच्या कारला ब्लॅक फिल्म लावल्याचे आढळून आले. ब्लॅक फिल्म कोटिंग असल्यामुळे कार व इतर वाहनांमध्ये कोण बसले हे बाहेरून दिसत नाही. शहरातून अथवा बाहेरून कोणी गुन्हेगार, दहशतवादी अशा ब्लॅक फिल्म कोटिंगने झाकलेल्या काचेच्या वाहनातून पळाला अथवा आला, तर पोलिसांना काहीही करता येणे शक्य नाही. ४तडीपार केलेले गुंड अशा कारमधून शहरात रोज फिरत राहिले तरी पोलिसांच्या नजरेस ते येऊ शकणार नाहीत. मंगळसूत्र चोर किंवा जे सराईत गुन्हेगार आहेत जे पोलीस रेकॉर्डवर आहेत तेदेखील अशा वाहनातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होऊ शकतात. वाहनातून अपहरणाचे प्रकारदेखील होऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. पोलीस ब्लॅक फिल्म कोटिंग काचेच्या वाहनांकडे का दुर्लक्ष करतात हे कळण्यास मार्ग नाही. हेल्मेटसक्ती, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसतात; परंतु ब्लॅक फिल्म कोटिंग असलेल्या कारवर कारवाई करताना दिसत नाहीत.उत्पादक, विके्रत्यांंकडे दुर्लक्ष४शहरातील अनेक भागांमध्ये कार डेकोरेशन करणाऱ्यांची दुकाने आहेत. त्या दुकानांमध्ये ब्लॅक फिल्म विक्री होते काय, होत असली तरी त्यावर कारवाई कुणी करावी, असा प्रश्न आहे. ग्रे आणि ब्लॅक अशा दोन प्रकारच्या फिल्म विक्री होतात. विधिज्ञांचे मत असे...४ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सगर किल्लारीकर यांनी सांगितले की, सर्वाेच्च न्यायालयाने ब्लॅक फिल्मच्या वापरावर बंदी का आणली, याचाच विसर कारवाई करणाऱ्या यंत्रणेला पडला आहे. संसदेवर हल्ला करणारे अतिरेकी ब्लॅक फिल्म कोटिंग असलेल्या कारमधूनच आले होते. पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींवर अत्याचाराच्या घटना अशाच कारमधून घडल्या. त्या पार्श्वभूमीवर सर्वाेच्च न्यायालयाने त्या फिल्मच्या वापरावर आणि उत्पादनावर बंदी आणली; परंतु अलीकडे पोलिसांना त्याचा विसर पडला आहे. काही पोलिसांच्याच खाजगी वाहनांना त्या प्रकारच्या फिल्म पाहावयास मिळतात. त्यामुळे कारवाई कुणी करावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘ब्लॅक फिल्म’चा काळाबाजार!
By admin | Updated: May 3, 2016 01:10 IST