लातूर : गोपीनाथ मुंडे आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून सोबत काम केले. ते नेहमीच शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांच्या प्रश्नांवर चर्चा करायचे. आज गोपीनाथ मुंडे असते तर चित्र वेगळेच दिसले असते. त्यांच्या विचाराला जपणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज कार्यरत आहे. भाजपाचे लातूर ग्रामीणचे उमेदवार रमेश कराड यांना निवडून देऊन विकासकामे करण्याची संधी द्या, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ममदापूर येथे केले.लातूर ग्रामीणचे उमेदवार रमेश कराड यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री राजनाथ सिंह यांची सभा झाली. या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली. यावेळी उत्तराखंडचे माजी मंत्री अजय भट, देवेंद्रसिंह रावत, माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, भाजपा लातूर शहर मतदारसंघाचे उमेदवार शैलेश लाहोटी, ओमप्रकाश गोडभरले, दिलीप देशमुख, नवनाथ भोसले, हणमंत नागटिळक, श्रीकिशन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, महाराष्ट्रात आघाडी शासनाने अनेक घोटाळे केले. शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अवस्था बिकट झाली आहे. गेल्या चार महिन्यांत केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. जन-धन योजनेच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.लातूर ग्रामीणचे भाजपाचे उमेदवार रमेश कराड म्हणाले, गेल्या ६० वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने जनतेची दिशाभूल करून स्वत:चाच विकास करून घेतला. पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, वीज आदी प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. ग्रामीण मतदारसंघात दादा काढून नानाला आणले. काँग्रेसने सत्तेचा उपयोग मर्जीतील लोक सांभाळण्यासाठीच केला. त्यांच्या जुलमी राजवटीला जनता कंटाळली आहे. जनतेचा सेवक म्हणून काम करण्यासाठी आपल्याला मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
भाजपा कार्यकर्त्यांना ऊर्जा
By admin | Updated: October 8, 2014 00:52 IST