लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या वाढत्या तक्रारींना आळा घालण्यासाठी आता प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक बसविण्याचा निर्णय बुधवारी आयोजित शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती शिक्षण सभापती तथा उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी दिली़जिल्ह्यात प्राथमिक विभागाच्या जवळपास १७०० शाळा आहेत़ या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेतात़ परंतु, गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी, पालकांच्या शिक्षकांबाबत तक्रारी वाढल्या आहेत़ शिक्षक उशिरा येणे, शाळेच्या वेळेतच शिक्षकांचे निघून जाणे, रजा न घेता एक-एक दिवस शाळेतच न येणे आदी तक्रारी शिक्षण विभागाकडे मागील काही दिवसांपासून वाढल्या आहेत़या तक्रारींना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती यांच्या दालनात शिक्षण सभापती भावनाताई नखाते यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक घेण्यात आली़या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचा सेस फंड, ग्रामपंचायतीचा १४ वा वित्त आयोग आदी ठिकाणचा निधी खर्च करून प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला़ तसेच जिल्ह्यातील निजामकालीन वर्ग खोल्यांच्या जागी नवीन वर्ग खोल्या बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला़ शैक्षणिक दर्जा उंचावण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.या बैठकीस शिक्षण समितीचे सदस्य अजय चौधरी, प्रभाकर चापके, पार्वती वाघमारे, प्रणिता राठोड, विशाखा सोळंके, उमा वाकणकर, गंगूबाई नागेश्वर, शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती़
जि़प़च्या शाळेत आता बायोमेट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:40 IST