मोहन बोराडे, सेलूमोरेगाव येथील बायनाबाई लोंढे यांच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य, स्वत: अशिक्षित घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, शेतमजुरी करून दोन वेळची भाकरी कमावत जगणाऱ्या अगदी सामान्य कुटुंबातील ही महिला सेलू पंचायत समितीच्या सभापती- पदाची धुरा सांभाळणार आहे़ येथील पंचायत समितीच्या सभापती पदाचे अडीच वर्षांसाठी आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहे़ बहुमत नसतानाही सेनेच्या बायनाबाई गमाजी लोंढे यांची सभापतीपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे़ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोरेगाव गणातून सेनेच्या तिकिटावर बायनाबाई लोंढे या केवळ २९ मतांनी विजयी झाल्या होत्या़ पंचायत समितीत राकाँकडे स्पष्ट बहुमत आहे़ दहापैकी आठ सदस्य राकाँचे निवडून आले आहेत तर सेनेकडे दोन सदस्य आहेत़ मात्र राकाँकडे अनुसूचित जातीचा सदस्य नसल्यामुळे व सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्यामुळे बायनाबाई लोंढे यांना सभापतीपदाची संधी चालून आली आहे़ बायनाबाई लोंढे यांनी पं़ स़ सदस्याची निवड होण्यापूर्वी ग्रा़पं़ सदस्य म्हणून काम पाहिलेले आहे़ शेत मजुरी करून बायनाबाईनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपल्या मुलांना घडवले आहे़ त्यांचा भगवान हा मुलगा गुत्तेदार आहे. दुसरा मुलगा अंकुश हा सामाजिक कार्यात अग्रेसर असतो़ तर तिसरा मुलगा आबासाहेब लोंढे हे जि़ प़ शाळेवर शिक्षक आहे़ अत्यंत सामान्य कुटुंबातील ही महिला तालुक्याचा कारभार पाहणार आहे़ १४ सप्टेंबर रोजी पं़ स़ सभापतीपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे़
बायनाबाई लोंढे यांना सभापतीपदाची लॉटरी
By admin | Updated: August 31, 2014 00:11 IST