बदनापूर : तालुक्यातील शाळा सुरु पंधरा दिवस झाले.अद्यापही या तालुक्यातील विद्यार्थिनींना मानव विकासमधील सायकलींचे अनुदान मिळालेले नाही.शासनाने ज्या गावातील शालेय विद्यार्थिनींना शाळेत जाण्याकरिता मानव विकासची बससेवा मिळत नाही. त्यांना शाळेत पायपीट करीत जावे लागते.विद्यार्थिनींना एका सायकलसाठी प्रत्येकी तीन हजार रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बदनापूर तालुक्यातील सुमारे ५५० विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होणार आहे. यापैकी दोन हजार रूपये तातडीने संबंधित विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. एक हजार रूपये सायकल खरेदी केल्याची पावती दाखविल्यानंतर देण्यात येणार आहेत.गेल्या दोन वर्षापासून जिल्हास्तरावर किंवा तालुकास्तरावर सायकल खरेदी करण्याच्या युक्तीवादानंतर अखेर मुलींना नगदी स्वरूपात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र या शासन निर्णयाची अंमलबजावणी संथ गतीने होत आहे. शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी सुध्दा मुलींना सायकल खरेदी करण्याकरिता निधी मिळालेला नाही. याविषयी गटशिक्षणाधिकारी आर. बी. वाणी म्हणाले की, हा शासननिर्णय पूर्वीचा असला तरी या योजनेकरीता निधी आलेला नव्हता आता निधी आला आहे. संबंधित मुख्याध्यापकांना संबंधित शाळेतील विद्यार्थीनींच्या संख्येनुसार या निधीचे धनादेश देण्यात आले आहेत.आता मुख्याध्यापक हा निधी प्रत्येक विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर आरटीजीएस द्वारे जमा करणार आहेत. अद्यापपर्यंत किती विद्यार्थिनींनी बँक खाते उघडले किती विद्यार्थिनींना निधी मिळाला याबाबत माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)प्रतीक्षा संपणार कधी?गेल्या दोन वर्षापासून जिल्हास्तरावर किंवा तालुकास्तरावर सायकल खरेदी करण्याच्या युक्तिवादानंतर अखेर मुलींना नगदी स्वरूपात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थिनींची गैरसोय लक्षात घेता तात्काळ धनादेश वितरित करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
सायकलींचे अनुदान अद्यापही गुलदस्त्यातच
By admin | Updated: July 3, 2014 00:21 IST