जालना : समाजात श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होत असल्याने अनेकजण या बुवांच्या थापांना व खोट्या चमत्कारांना बळी पडतात. श्रद्धा डोळस असावी, असे सांगून सर्वसामान्यांच्या जीवनातून अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची ग्रामीण पातळीपर्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पीआयएमसीचे सह अध्यक्ष तथा अंनिसचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी येथे व्यक्त केले. येथील फुलंब्रीकर नाट्यगृहात समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने रविवारी आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, सुरेश झुरमुरे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त बी.एन. वीर, तहसीलदार रेवननाथ लबडे, मधुकर कांबळे, सुनील वाघ, प्रवीण गांगूर्डे, मिलिंद सावंत, प्रा. रेणुका भावसार, दिलीप सोळुंके, पुष्कराज तायडे आदींची यावेळी उपस्थिती होती.जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या कायद्याचा प्रसार सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने करण्यात येत असून राज्यातील सहा विभागामध्ये वक्ता प्रशिक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच दक्षता अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नागरिकांनीही या प्रसार आणि प्रचार कार्यक्रमास सहभाग नोंदविल्यानंतर हा कायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असेही मानव यांनी सांगितले.जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणाची कामे करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस व त्यास मदत करणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाही होऊ शकते. त्याचबरोबर दोष सिद्ध झालेल्या व्यक्तीस सहा महिने ते सात वर्षे कारावास व पाच हजार रूपये ते पन्नास हजार रूपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. शिक्षापात्र अपराध हे दखलपात्र व अजामिनपात्र गुन्हा असेल असेही प्रा. मानव यांनी सांगितले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नायक म्हणाले की, समाजामध्ये आपण जगत असताना अंधश्रद्धेसारख्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता प्रत्येक बाबींची तपासणी करून पहावी. जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही केली जाईल. तसेच सर्वसामान्य जनतेनी अंधश्रद्धेला खतपाणी न घालता डोळसपणे जगण्याबरोबरच या अंधश्रद्धेपासून स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबियाला तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)मानव म्हणाले की, या आधुनिक युगात मानवाने गत १००-१५० वर्षात खूप प्रगती केली आहे. जगात विज्ञानाचा आधार न घेता कोणालाच चमत्कार करता येत नाही. जे चमत्कार सर्वसामान्यांना दाखविले जातात ते फक्त वेगवेगळ्या क्लृप्त्या किंवा वैज्ञानिक प्रयोगांचा आधार घेऊन दाखविले जातात. जीवनामध्ये जगताना विश्वास गरजेचा आहे.४परंतु त्याबाबतचा पुरावा समोर आल्यानंतर त्याची सत्यता पडताळून पाहणेही तितकेच गरजेचे आहे. समाजात वावरणाऱ्या अशा या भोंदूंपासून स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबिय व शेजाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्रद्धा डोळस असावी - मानव
By admin | Updated: January 5, 2015 00:36 IST