कन्नड : तालुक्यात औद्योगिक वसाहत व्हावी या उद्देशाने थोडेअधिक झालेले प्रयत्न अपुरे पडले असून, अद्यापपर्यंत तरी ही मागणी धसास लागलेली नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहत कन्नड तालुक्यासाठी मृगजळ ठरत आहे.कन्नड तालुक्यातून राष्ट्रीय मार्ग २११ जातो. कन्नड शहर याच महामार्गावर आहे. या तालुक्यात औद्योगिक वसाहत झाली तर छोटे-मोठे उद्योग सुरू होतील. त्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल आणि तालुक्याच्या विकासाला हातभार लागेल. कन्नडपासून अवघ्या ३० कि.मी.वर म्हणजे चाळीसगावाहून रेल्वेसेवा आहे, त्यामुळे मालाची वाहतूक करण्यास फारशा अडचणी नाहीत. औद्योगिक वसाहतीसाठी लागणारे पाणी शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पातून मिळू शकते.औद्योगिक वसाहत कन्नड येथे शहरालगत व्हावी यासाठी स्व. आमदार रायभान जाधव यांनी सर्वप्रथम प्रयत्न केले. त्यानंतर माजी आमदार नितीन पाटील यांनीही पाठपुरावा केला. कन्नड-चाळीसगाव रस्त्यावरील अंबाडी मध्यम प्रकल्पाजवळील जमिनीची पाहणीही त्यावेळी करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी अनिल पाटील सोनवणे यांनीही प्रयत्न केले; पण अद्यापपर्यंत तरी औद्योगिक वसाहत सुरू होऊ शकलेली नाही. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न ही मोठी समस्या ठरत आहे. दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांच्या संख्येत भर पडत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुभाष पाटील यांनी शहरात नुकताच नोकरी महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात तीन हजार बेरोजगार तरुण व सुमारे पाचशे तरुणींनी नोंदणी केली व मुलाखाती दिल्या. यावरून बेकारीचा प्रश्न किती गंभीर आहे याची कल्पना येते.तालुक्यात कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या रूपाने एकमेव औद्योगिक उद्योग होता, तोही विक्री झाल्याने खाजगी झाला आहे. आता या तालुक्यात लहान-मोठे उद्योग सुरू होण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी मंजुरी मिळवून उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष घालून औद्योगिक वसाहत लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अद्यापपर्यंत तरी तालुकावासीयांसाठी औद्योगिक वसाहत मृगजळच ठरत आहे.(वार्ताहर)
औद्योगिक वसाहत ठरली कन्नड तालुक्यासाठी मृगजळ!
By admin | Updated: July 16, 2014 01:28 IST