औरंगाबाद : मद्यप्रेमींनो सावधान... थर्टीफर्स्टच्या रात्री दारू पिऊन गोंधळ घातला किंवा नशेत ‘धूम’स्टाईल वाहन चालविताना पोलिसांच्या हाती लागलात, तर ‘लॉकअप’ची हवा खावी लागू शकते. कारण अशा उपद्रवी मद्यपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासूनच नववर्षाच्या जल्लोषाला सुरुवात होते. ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. डीजे लावून नाचगाणे होते, फटाके फोडले जातात, अनेक जण मद्यप्राशन करतात. नंतर बेदरकारपणे वाहने चालवितात, त्यातून अपघात होतात. अनेक निष्पापांना मद्यपींमुळे जीव गमवावा लागतो, अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. शिवाय दारू पिऊन आपापसात हाणामारीचे प्रकारही या रात्री घडतात, त्यातूनही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मद्यपींवर खास लक्ष ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी पोलिसांना दिले आहेत. कडेकोट बंदोबस्तमावळत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाच्या स्वागतात कोणतेही विरजण पडू नये, कायदा- सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ३१ डिसेंबरच्या दुपारपासून ते नववर्षाची पहाट उजाडेपर्यंत संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नुकत्याच बंगळुरू येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलीस अधिकच सतर्कता बाळगत आहेत. बंदोबस्तासाठी दीड हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात ३१ डिसेंबरच्या दुपारपासूनच तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले. चौकाचौकांत पोलीस तैनात असतीलच, शिवाय गल्लीबोळांमध्येही पोलीस पायी, वाहनांवर गस्त घालतील. शहराच्या बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात येणार असल्याचेही परदेशी म्हणाले. कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, त्याची गय करण्यात येणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
मद्यपींनो सावधान... नाही तर लॉकअपची हवा खाल!
By admin | Updated: December 31, 2014 01:05 IST