औरंगाबाद : सतरा दिवस झाले तरी शहरातील कचराकोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. कचर्यावर प्रक्रिया करणार्या चार अत्याधुनिक मशीन युद्धपातळीवर खरेदी करण्यात येतील, अशी माहिती रविवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. येणार्या दोन ते तीन दिवसांमध्ये कचराकोंडीही संपेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कचर्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात रविवारी एका खाजगी कंपनीने सादरीकरण केले. सादरीकरणानंतर महापौर म्हणाले की, या कंपनीचा अनुभव चांगला असून, देशातही कचरा व्यवस्थापनात चांगले काम असल्याने कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा हा चांगला पर्याय ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या महापालिकेला या तंत्रज्ञानाने कचर्यावर प्रक्रिया परवडणारी आहे. कारण वर्गीकरण झाल्याने निम्मा कचरा कमी होणार आहे. याशिवाय वाहतुकीचा, इंधनाचा व कामगारांवर होणारा खर्च कमी होणार आहे. सद्य:स्थितीत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. यासाठी बायो मेकॅनिकल कंपोस्ंिटगच्या चार मशीन खरेदी करण्यात येणार आहेत.
स्मार्ट सिटीसाठी प्राप्त निधीतून मशीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करावी लागेल. यात वेळ जाईल म्हणून तातडीने महापालिका फंडातून मशीनची खरेदी करण्यात येईल. चारपैकी एक मशीन मध्यवर्ती जकात नाका येथे वर्गीकरण केंद्रात, एक चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये नगरसेवक राजू शिंदे यांनी तयार केलेल्या शेडमध्ये बसविण्यात येईल तर दोन मशीन वाहनावर ठेवून शहराच्या वेगवेगळ्या भागात जिथे शंभर टक्के वर्गीकरण होत आहे त्या वॉर्डातून फिरविण्यात येणार आहेत. सोमवारपासून ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच महापालिकेच्या कर्मचार्यांकडे देणे नागरिकांना बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या तीस वॉर्डांमध्ये वर्गीकरण होते. आठ दिवसांमध्ये १०० टक्के वॉर्डांमध्ये वर्गीकरण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.७००० मेट्रिक टन कचरा होतामहापौर नंदकुमार घोडेले म्हणाले की, १७ दिवसांत शहरात सात हजार मेट्रिक टन कचरा साचला होता. त्यातून प्रशासन व पदाधिकार्यांनी मिळून गेल्या दोन-तीन दिवसांत तीन साडेतीन हजार टन कचरा उचलून कमी केला आहे. महापालिका प्रशासनाच्या मदतीला शहरातील नागरिकांचा फोरम पुढे आला आहे.सुजाण नागरिक प्रशासनासोबत आहेत. कचराकोंडीतून खूप काही महापालिकेला शिकायला मिळाले आहे. कचरा जिरविण्याचे नागरिकांना आवाहन केले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापुढे वर्गीकरण केलेलाच कचरा घेतला जाईल. भविष्यात कचरा रस्त्यावर दिसणार नाही.