अभिमन्यू कांबळे, परभणीपरभणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या चोवीस जणांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखती दिल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी उपस्थितांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. उमेदवारीसाठी गर्दी करणाऱ्यांऐवजी आपसात बसून चारच नावे निश्चित करा, त्यामधूनच एकाला पक्षाचे तिकीट देण्यात येईल, असे सांगितल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे पहावयास मिळाले. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस - राष्ट्रवादी एकत्रच लढविणार असल्याचे अनौपचारिकरित्या शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या जिल्ह्यातील परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या १९ रोजी मुुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुलाखती घेतल्या. पक्षाचे केंद्रीय सचिव वाल्मिकी, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. राजीव सातव, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, माजी खा.विलास मुत्तेमवार, प्रिया दत्त यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. परभणीतून २७ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २४ जणांनी मुंबईत मुलाखती दिल्या. मुलाखती देणाऱ्यांमध्ये अनेक नवखे कार्यकर्ते पाहून उपस्थित वरिष्ठ नेतेही चकित झाले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, अंतर्गत वादामुळेच पक्षाचा परभणीत पराभव होतो. त्यामुळे यावेळेला तरी मतभेद बाजुला ठेवून एकदिलाने काम करा. सर्वांनी एकत्र बसून चोवीस पैकी चार जणांची सर्वानुमते निवड करा. त्यापैकीच एकाला पक्षाचे तिकीट दिले जाईल, अशा कानपिचक्या दिल्यानंतर गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या काही इच्छुकांचा हिरमोड झाला. त्यामुळे आता २४ मधून चार जणांची निवड करायचीच कशी? असा सवाल वरिष्ठ नेत्यांसमोर उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे २४ इच्छुकांमध्ये ८ ते १० तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यांची नाराजी दूर करणे वरिष्ठांना कठीण जाणार आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षातील गटा-तटाच्या राजकारणात उमेदवारीची माळ कोणत्या इच्छुकाच्या गळ्यात पडेल, याची देखील परभणीवासियांना उत्सुकता लागली आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला परभणीतून मताधिक्य मिळाल्याने काँग्रेसजणांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. असे असले तरी आतापर्यंतचा इतिहास पाहता येथील मतदारांनी शिवसेनेलाच भरभरुन मतदान दिले आहे. त्यामुळे निवड करण्यात येणारा उमेदवार इतिहास घडविणार की इतिहासाची पुनरावृत्ती होणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
इच्छुकांच्या गर्दीला अशोकरावांच्या कानपिचक्या
By admin | Updated: August 21, 2014 23:19 IST