जालना : ग्रामीण भाग हा कलावंतांची खाण आहे. मात्र, त्यांना राजाश्रय मिळत नसल्याने अनेक कलावंत प्रकाशझोतात येऊ शकले नाहीत. त्यांना न्याय मिळत नाही. म्हणूनच अशा कलावतांना राजाश्रय मिळावा अशी अपेक्षा अभिनेता कैलास वाघमारे याने बुधवारी येथे व्यक्त केली. देशभरात माझा अनेक ठिकाणी सत्कार झाला. मात्र, आज घरच्या माणसाकडून झालेला सत्कार माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे, असे भावनिक उद्गार कैलासने याप्रसंगी काढले.आ. अर्जुन खोतकर यांनी बुधवारी जालना शहरातील एका चित्रपटगृहात ह्यमनातल्या उन्हातह्ण या चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन केले होते. या चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे, संभाजी तांगडे आदी उपस्थित होते. अस्सल ग्रामीण बाज असलेल्या या चित्रपटाला राज्यभरात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे कैलासने सांगितले. यावेळी कैलासची आई, भाऊ यांचा सत्कार करण्यात आला. भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरेसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या कैलासचा अभिनय क्षेत्रातील आतापर्यंतच प्रवास थक्क करणारा असल्याचे सांगून आपल्या जिल्ह्यातील कलावतांच्या चित्रपटाला अमेरिकेतील ग्लोब फेस्टमध्ये नामांकन मिळते, ही बाब गौरवास्पद असल्याचे आ. खोतकर म्हणाले. यावेळी अनिरुद्ध खोतकर, पंडित भुतेकर, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, अनुराग कपूर, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा संघटक सविता किवंडे, गंगूबाई वानखेडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील कलावंतांना राजाश्रय मिळावा
By admin | Updated: August 6, 2015 00:02 IST