!लातूर : मराठवाड्यासह लातुरात कृत्रिम पावसाचा गाजावाजा झाला होता़ अखेर हा प्रयोग लातूर जिल्ह्यात राबविण्यात आला असून, १२ फ्लेअर्सचा मारा करुनही पावसाचा एक थेंबही पडला नसल्यामुळे भ्रमनिरास झाला आहे़ ४, ६ आणि ७ आॅगस्ट या तीन दिवसांत लातूर, औसा, रेणापूर तालुक्यातील काही गावांचा परिसर असलेल्या भागात फ्लेअर्सचा मारा केला़ परंतू पाऊस पडला नाही़ प्रयोगानंतर किमान एका घंट्यात पाऊस पडतो़ परंतू लातुरात हा अनुभव आला नाही़लातूर जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे़ यंदाचा तर खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे़ त्यामुळे मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग शासनाने हाती घेतला आहे़ या प्रयोगाचा मोठा गाजावाजाही करण्यात आला़ दस्तुरखुद्द महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी फ्लेअर्सचा मारा करणाऱ्या विमानात बसून मराठवाड्याचा फेरफटका मारला होता़ लातूर तालुक्यातील मुरुड, जायफळ, बोरगाव या परिसरात ४ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास १८़४०२४ अक्षांश व ७६़२४१३ च्या रेखांशावर विमानाद्वारे फ्लेअर्स फायर्ड करण्यात आले़ दोन वेळा फ्लेअर्सचा मारा करण्यात आला़ परंतु, ढगाचा छेद या फ्लेअर्सला झाला नाही़ तज्ञांच्या मते फ्लेअर्स झाल्यानंतर किमान एका तासात पाऊस पडतो़ परंतू मुरुड, जायफळ, बोरगाव परिसरात या फ्लेअर्सद्वारे पावसाचा थेंबही पडला नाही़ त्यानंतर ६ आॅगस्ट रोजी सकाळी ११़४३ वाजण्याच्या सुमारास रेणापूर तालुक्यातील म्हणजे १८़५४४२ अक्षांश व ७६़४१९४ रेखांशावरील गांजूर, रुई, रामेश्वर, सारसा परिसरात दोन फ्लेअर्सचा मारा करण्यात आला़ ६ आॅगस्ट रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास औसा तालुक्यातील रिंगणी, शिवली, बिरवली, मासुर्डी परिसरात म्हणजे १८़२०५८ अक्षांश व ७६़३४८२ च्या रेखांशावर दोन फ्लेअर्सचा मारा करण्यात आला़ हा प्रयोगही फसला़ रिंगणी, शिवली, बिरवली, मासुर्डी परिसरातही पाऊस झाला नाही़ परत याच परिसरात परंतु, १८़१८७८ अक्षांश व ७६़३६६५ रेखांशावर पुन्हा दोन फ्लेअर्स उडविण्यात आले़ परंतू यावेळेही शुन्य मि.मी. पाऊस झाला़ परत तिसरा प्रयोग १२़११ मिनिटांनी १८़२०१७ अक्षांश व ७६़४१३२ रेखांशवर म्हणजे सिंधाळा, बेलकुंड, एकंबी परिसरात झाला़ ६ आॅगस्ट रोजी एकाच दिवशी ८ फ्लेअर्सद्वारे मारा करण्यात आला़ परंतू यश आले नाही़ शेवटचा प्रयोग ७ आॅगस्ट रोजी राबविण्यात आला़ १८़२२१७ अक्षांश व ७६़३००८ रेखांशवर दोन फ्लेअर्सचा मारा करण्यात आला़ शिवली, वडजी, बिरवली परिसरात हा मारा झाला़ प्रशासनाचा हाही प्रयत्न फसल्याने पावसाचा थेंबही या भागात बरसला नाही़ (प्रतिनिधी)
कृत्रिम पावसाचे हवेतच बार; अहवालातही पाऊस शुन्यच
By admin | Updated: August 27, 2015 00:23 IST