नवीन नांदेड : तथागत गौतम बुद्ध, म. ज्योतीबा फुले, छ. शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी ‘विचारांची पेरणी’ साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांनी केली, असे प्रतिपादन प्रा. डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी केले. नांदेडच्या सिडको-हडको परिसरातील सार्वजनिक साठे जयंती मंडळाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित सोहळयात प्रमुख वक्ते म्हणून दुडूकनाळे बोलत होते. अध्यक्षस्थानी जी. सी. मेकाले तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. ओमप्रकाश पोकर्णा, रामराव सूर्यवंशी, आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी भीमराव शेळके, ‘लसाकम’ चे जिल्हाध्यक्ष हणमंतराव वाडेकर, पोलिस उपनिरीक्षक एन. डी. रोडे, संकेत पाटील, प्रमोद टेहरे, संजय इंगेवाड व दिगंबर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा.डॉ. दुडूकनाळे पुढे म्हणाले, माणूस हाच ईश्वर अण्णाभाऊंनी मानला. अण्णाभाऊ आयुष्यात कुठल्याच मंदिरात दर्शनासाठी गेले नाहीत, त्यामुळे त्यांचा विचार आपण निटपणे समजावून घेतला पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, अण्णा भाऊ साठे यांनी आपले साहित्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केले असल्याचे सांगून संपूर्ण जगात फक्त पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव महापुरूष असल्याचे सांगितले. सभेपूर्वी अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राची सिडको - हडको भागातील प्रमुख रस्त्याने ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान,जेष्ठ शाहीर तथा प्रबोधनकार भगवानराव गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेला पोवाडा व समाजप्रबोधनपर आधारीत गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रास्ताविक चंद्रकांत मेकाले यांनी, तर सूत्रसंचालन बालाजी गवाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष नारायणराव कोलंबीकर व त्यांचे सहकारी पदाधिकारी पेंटर श्रीरंग खानजोडे, दत्ता शिंदे, हरीश्चंद्र गोपले, जी. व्ही. द्रोणाचार्य, देविदास सूर्यवंशी, किशन वाघमारे, एस.पी. कुंभारे, ज्ञानेश्वर डोम्पले, निवृत्तीराव कांबळे, सुनील अंबुलगेकर, राहुल वाघमारे, मरीबा बसवंते व शिलानंद मेकाले आदींनी के. एन. बोराळे, दिगंबरराव महाराज ढाकणीकर, के. एल. ढाकणीकर, टी. एस. वाघमारे, नागोराव गजले, डी. एम. बुजवणे आदींच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले. (वार्ताहर) २७ भाषांमध्ये साहित्याचे भाषांतरअण्णा भाऊ साठे हे विवेकी व विज्ञाननिष्ठ साहित्यीक असल्याचे सांगून त्यांच्या साहित्याचे २७ भाषेमध्ये भाषांतर झाले असल्याचे स्पष्ट केले. तमाशाचे रूपांतर लोकनाटयामध्ये करणारे पहिले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे असल्याचे स्पष्ट करून अण्णा भाऊंंच्या साहित्यामुळे रशियात क्रांती झाली असल्याचे यावेळी सांगितले. अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्याला जागतिक दर्जा मिळवून दिले असल्याचे नमूद करून त्यांनी मौज-मजा करण्यासाठी रशियाचा प्रवास केला नाही, तर दारिद्रयाच्या शोधार्थ रशियाचा प्रवास केला असल्याचे दुडूकनाळे यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
परिवर्तनवादी विचारांची पेरणी अण्णाभाऊंनी केली
By admin | Updated: September 5, 2014 00:08 IST