औरंगाबाद : मराठवाड्यात पहिल्यांदाच अवयवदानाचा इतिहास लिहिणाऱ्या औरंगाबाद शहरात प्रथमच बुधवारी अन्य शहरातून प्रत्यारोपणासाठी अवयव दाखल झाले. नांदेड ते औरंगाबाद हे अंतर अवघ्या पाच तासांत पार करून शहरातील दोन रुग्णालयांमध्ये किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे दोघांना नवीन आयुष्य मिळाले.नांदेड येथे ब्रेनडेड घोषित करण्यात आलेले सुधीर रावळकर यांच्या नातेवाईकांनी अवयवदानातून कोणाचा तरी जीव वाचेल आणि त्यातूनच आपल्या व्यक्तीला पुन्हा पाहता येईल, या भावनेने अवयवदानास संमती दिली. त्यानुसार त्यांचे हृदय नांदेड येथून मुंबईला, यकृत पुण्याला, तर दोन किडन्या औरंगाबादला नेण्याचे नियोजन करण्यात आले. शहरातील कमलनयन बजाज हॉस्पिटल व एमजीएम हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची तयारी करण्यात आली. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉरचेही नियोजन करण्यात आले. नांदेड येथून दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास दोन्ही किडन्याचा औरंगाबादच्या दिशेने प्रवास सुरू झाला. रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास किडनी घेऊन आलेली कार एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. याठिकाणी सज्ज असलेले डॉक्टर्स अवयव घेऊन प्रत्यारोपणासाठी रवाना झाले. अवघ्या तीन मिनिटांत प्रक्रिया पूर्ण करून किडनी हॉस्पिटलमध्ये देऊन ही कार बजाज हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाली. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत हे अंतर पूर्ण करून ही कार बजाज हॉस्टिलमध्ये दाखल झाली. या ठिकाणीही तयार असलेल्या डॉक्टरांच्या पथकाने तात्क ाळ किडनी प्रत्यारोपणासाठी नेली. दोन्ही ठिकाणी तज्ज्ञांनी परिश्रम घेतले.सात तासांचे अंतर पाच तासांतनांदेड ते औरंगाबाद या अंतरासाठी जवळपास सात तास लागतात; परंतु अवयव प्रत्यारोपणासाठी हे अंतर पाच तासांत पूर्ण करण्यात आले. शहरात यापूर्वी सहा वेळा झालेल्या अवयवदानात अवयव बाहेर पाठविण्यात आले. परंतु प्रथमच प्रत्यारोपणासाठी अवयव (किडनी) शहरात आली.संपूर्ण तयारीनांदेड येथून किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्णालयात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संपूर्ण तयारी करण्यात आली. रात्री ८.४० वाजता किडनी घेऊन कार रुग्णालयात दाखल झाली.यासाठी ग्रीन कॉरिडॉरचे नियोजन केल्याचे कमलनयन बजाज हॉस्पिटलचे मॅनेजर (आॅपरेशन्स) डॉ. नताशा वर्मा यांनी सांगितले.औरंगाबाद : गतवर्षी एका ब्रेनडेड तरुणाने १४ जानेवारी रोजी केलेल्या अवयवदानामुळे तीन रुग्णांना जीवदान मिळाले. या घटनेपासून मराठवाड्यात अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक होत आहे. नांदेड येथे एका रुग्णाने दान केलेल्या दोन्ही किडन्या औरंगाबादेतील कमलनयन बजाज हॉस्पिटल आणि एमजीएम रुग्णालयातील रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आल्या.सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती म्हणाले की, कमलनयन बजाज हॉस्पिटल व एमजीएममध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण होणार आहे. नांदेड येथील ब्रेनडेड रुग्णाच्या दोन्ही किडन्या दान केलेल्या आहेत. त्या किडन्या औरंगाबादेत आणण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना कळविण्यात आली. त्यानंतर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण, पो. नि. बी. बी. शिंदे, पो. नि. अविनाश आघाव व कर्मचाऱ्यांनी केम्ब्रिज चौक ते एमजीएम व एमजीएम रुग्णालय ते कमलनयन बजाज रुग्णालय, असा ग्रीन कॉरिडॉर तयार केला. या ग्रीन कॉरिडॉरला रात्री ७.१५ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर या ग्रीन कॉरिडॉरमध्ये किडनी घेऊन आलेल्या वाहनाला प्रथम एमजीएमपर्यंत आठ मिनिटांत पोहोचविण्यात आले. त्यानंतर एमजीएम ते कमलनयन बजाज हॉस्पिटल हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करण्यात आले.
प्रत्यारोपणासाठी दुसऱ्या शहरातून औरंगाबादेत अवयव
By admin | Updated: October 20, 2016 01:41 IST