अंबड : शहरास केवळ दोन दिवस पुरेल एवढा जलसाठा शहरालगतच्या डावरगाव तलावात शिल्लक आहे. शहराला दोन दिवसानंतर निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबडला पाणी देण्यास जालन्याच्या लोकप्रतिनिधींनी नकार दिल्याने शहरास १ नोव्हेंबर पासुन पाणी मिळणार की नाही याचे नक्की उत्तर सध्या तरी कोणाकडेही नाही. अगोदरच भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या अंबडच्या नागरिकांना ३१ आॅक्टोबर नंतर पाणी पुरवठा बंद होणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शहरात जागोजागी केवळ याच विषयाची चर्चा सुरु असुन आता लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आॅक्टोबर महिना सुरु असतानाही अंबड शहरास दर दहा दिवसांनी एकदा पाणी पुरवठा सुरु करण्यात येतो. नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे अपुऱ्या पावसामुळे उपलब्ध असलेला अपुरा जलसाठा. शहरास शहागड येथील जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचा जलसाठा, पाचपिंपळ विहीर व डावरगांव तलाव या तीन ठिकाणाहुन पाणी पुरवठा करण्यात येतो. शहागड-अंबड पाणीपुरवठा योजना कालबाहय झाल्याने त्यातील लोखंडी पाईप गंजून ठिकठिकाणी पाणी गळती असल्याने योजनेतुन पाणी पुरवठा करण्यास पालिकेस अडचणी निर्माण झाल्या आहेत, पाचपिंचळ विहीरीतील जलसाठा संपला आहे तर डावरगांव तलावात केवळ ३१ आॅक्टोबर पर्यंत एवढेच पाणी शिल्लक आहे.अशा परिस्थितीत शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी-जालना योजनेतुन जोडणी मिळणे एवढा एकच मार्ग शिल्लक राहिला असल्याचा अंबड पालिकेचा दावा आहे.पूर्वी जालना शहरास शहागड-अंबड-जालना संयुक्त जलयोजनेतुन पाणी पुरवठा केला जात असे. मात्र कालातंराने या योजनेतून होणारा अपुरा पाणीपुरवठा व कालबाह्य झाल्यामुळे जलयोजनेस लागलेली गळती या सर्व कारणांमुळे जालना शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना निर्माण करण्यात आली. त्यावेळी योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राची इमारत मत्स्योदरी देवी मंदीराच्या पायथ्याशी उभारण्यात आली. जलशुध्दीकरण केंद्राची इमारत शहरात असल्याने व त्यावेळचे एकंदर सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दिलेली आश्वासने पाहता योजनेतून पाणी मिळण्याबाबत शहरवासीय आश्वस्त होते. मात्र आता परिस्थिती पुर्णपणे बदललेली पाहावयास मिळत आहे.शहरास पाणी मिळण्यासाठी माजी पालकमंत्री राजेश टोपे कमालीचे आग्रही आहेत तर दुसरीकडे जालन्याचे माजी आ.कैलास गोरंटयाल यांचा आधी १५ कोटी रुपये द्या मग पाणी घ्या हा आग्रह. दुसरीकडे ३१ आॅक्टोबरपर्यंत म्हणजेच केवळ दोन दिवस टिकेल एवढाच पाणीसाठी शिल्लक असल्याने जायकवाडी-जालना योजनेतुन ३१ आॅक्टोबर पर्यंत पाणीपुरवठा सुरु न केल्यास आमरण उपोषणाचा नगराध्यक्षा मंगल कटारे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेला इशारा या सर्व परिस्थितीत शहरास किती दिवस निर्जळीचा सामना करावा लागेल याविषयी शहरावर चितेंचे सावट पसरले आहे. याविषयी अंबडच्या नगराध्यक्षा मंगल कटारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्हाला फुकटचे पाणी नको आहे. आम्हाला मीटर लावून पाणी देण्यात यावे व जेवढे पैसे आम्ही भरु तेवढेच पाणी आम्हाला मिळावे ही आमची भूमिका आहे. जालना पालिकेने मागणी केलेले १५ कोटी रुपये अंबडची क दर्जाची नगरपालिका कशी भरु शकते. पालिका क दर्जाची असल्याने उत्पन्नाचा विचार करता ही गोष्ट शक्य नाही. दीड कोटी रुपये भरण्याची आमची तयारी असून त्याच रकमेचे पाणी आम्हास द्यावे. त्यानंतर आम्ही पैसे भरले तरच आम्हाला पाणी देण्यात यावे, असे नगराध्यक्षा कटारे यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)अंबड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात जलसाठा दोन दिवस पुरेल एवढाच असल्याने, अंबडवासियांसमोर पाणी टंचाईचे मोठे संकट ओढावणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यातच आता जालना - जायकवाडी पाणी पुरवठा योजनेतून अंबडला पाणी देण्याची मागणी जोर धरत आहे.
अंबडकरांची होणार पाण्यासाठी भटकंती
By admin | Updated: October 31, 2014 00:33 IST