अंबड : शहराचे पाणी पुन्हा एकदा पेटु लागले आहे. शहरास अवघे काही दिवस पुरेल एवढाच जलसाठा अंबड पालिकेकडे शिल्लक असून जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून ३१ आॅक्टोबरपर्यंत अंबड शहरास पाणीपुरवठा सुरु न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा अंबडच्या नगराध्यक्षा मंगल कटारे यांनी विभागीय आयुक्तांना निवेदनाव्दारे दिला आहे. तर त्याच्या प्रत्युत्तरात जालना नगरपालिकेत सत्ता असलेल्या काँगे्रसचे माजी आ.कैलास गोरंटयाल यांनी अंबड पालिकेने १५ कोटी रुपये भरल्याशिवाय अंबडला कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडणार नसल्याची भूमिका पत्रकार परिषदेत जाहीर केली. साधारण दीड ते दोन वर्षापूर्वी गोरंट्याल यांनी अशीच भूमिका घेतल्यानंतर तत्कालिन आमदार संतोष सांबरे यांनी अंबड शहराचा जायकवाडी-जालना परियोजनेत समावेश करण्याच्या मागणीसाठी जल आंदोलन उभारले होते. त्यावेळी आंदोलनामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते. आज या घडामोडी घडत असताना सर्व शहरवासीयांचे लक्ष बदनापूरचे नवनिर्वाचित आ. नारायण कुचे यांच्या भूमिकेकडे लागले आहे. सांबरे यांच्या कारकीर्दीत अधुरे राहिलेले जलआंदोलन नारायण कुचे पूर्ण करणार का याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.शहराची एकुण लोकसंख्या ३१ हजार ५३१ आहे. शहरवासीयांची दररोजची पाण्याची गरज आजघडीला दीड ते दोन एमएलडी एवढी आहे. जायकवाडी-जालना पाणी पुरवठा योजनेची क्षमता ६५ एमएलडी असून योजनेतून सध्या दोन एमएलडी व भविष्यकाळात पाच एमएलडी पाणी देण्याची अंबडवासीयांची जुनी मागणी आहे. विशेष म्हणजे जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्राची भव्य इमारत शहरातील मत्स्योदरी देवी मंदिराच्या पायथ्याशी आहे. दररोज या वाहिनीतून लाखो लिटर पाण्याचा पुरवठा जालना शहरास होत असल्याचे माहित असल्याने दिवसेंदिवस अंबडवासीयांची पाण्याची मागणी जोर धरत आहे. मागील वर्षी जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर जुनी शहागड-अंबड-जालना योजनेतून जालना शहरास मिळणारे पाणी बंद करण्यात आले. मात्र अंबड शहराचा जायकवाडी-जालना योजनेत समावेश न केल्यामुळे आजही अंबड शहरातील जनता कालबाह्य झालेल्या शहागड-अंबड पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे. कालबाह्य झालेल्या या योजनेच्या डागडुजी तसेच इतर खर्च अंबड पालिकेस झेपत नसल्याचे अगोदरच स्पष्ट झाले आहे.अंबड शहरास केवळ ३१ आॅक्टोबर पर्यंत पुरु शकेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे. ३१ आॅक्टोबर पर्यंत अंबड शहराचा जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेत समावेश न केल्यास आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा सोमवारी अंबड पालिकेच्या नगराध्यक्षा मंगल कटारे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.खुद्द नगराध्यक्षांना विभागीय आयुक्तांना भेटून पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी आमरण उपोषणाचा इशारा द्यावा लागत असल्याने शहराच्या गंभीर पाणी संकटाची दाहकता सर्वांना जाणवू लागली आहे.दुसरीकडे जालना पालिकेचे सर्वेसर्वा माजी आ.कैलास गोरंटयाल यांनी १५ कोटी रुपये भरल्याशिवाय पाणी न देण्याची भूमिका पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेली आहे, हे विशेष . (वार्ताहर)
अंबडचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला...
By admin | Updated: October 29, 2014 00:43 IST