लातूर : राज्यात शेतकरी संघटनेची शकले खूप झाली आहेत. आर. पी. आयसारखी दशा झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकच संघटना मजबूत करणे ही काळाची गरज आहे. परंतु मोठ्या नेत्यांच्या वैयक्तिक इगोमुळेच या दुफळ्या झाल्या असून यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास अडचणी येत असल्याचे मत मांडून भाजपाने स्वामीनाथ समितीच्या शिफारसीबाबत घेतलेला ‘यु टर्न’ ही सर्वात धक्कादायक असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रवक्ते संजय पाटील घाटणेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले. घाटणेकर हे बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमानिमित्ताने लातूर येथे आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शरद जोशींची शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांचे सर्वात मोठे संघटन होते. या संघटनेच्या मुशीत तावून-सुलाखून निघालेल्या कार्यकर्त्यांची फळी तयार झाली. परंतु महत्त्वकांक्षेपोटी पुढे शेट्टींची स्वाभीमानी वेगळी झाली. रघुनाथदादा वेगळे झाले. आमची बळीराजा आली. त्यानंतर आता अनेक छोट्या-मोठ्या संघटनांची निर्मिती होत आहे. भविष्यात अशा संघटना वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या संघटना वाढणे ही बाब जमेची असली तरी पार अनेक शकलांमध्ये विभागणे ही बाब शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी चांगली नाही. केवळ काहींच्या इगोमुळेच हे घडते आहे. स्वत:चे राजकीय अस्तित्व स्वतंत्र ठेवून शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्यांवर सर्व शेतकरी संघटना एक झाल्या तर सरकारला पळता भुई थोडी होईल आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. परंतु खुर्चीचे मोह अनेकांना असे करु देत नाहीत. अशा पध्दतीने जर कुणी पुढे येत असेल तर आमची बळीराजा शेतकरी संघटना पहिला पुढाकार घेईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सर्व शेतकरी संघटनांचे एकत्रिकरण आवश्यक
By admin | Updated: March 29, 2016 00:44 IST