जालना : धर्मनिरपेक्षतेचा उदो-उदो करणाऱ्या राजकीय पक्षांनी या निवडणुकीत धर्मासह जाती-पातीची समिकरणे जुळविण्याचा अटोकाट प्रयत्न सुरू केला आहे. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत धर्मासह जाती-पातीची समिकरणे प्रभावी ठरली आहेत. याही निवडणुकीत तीच पारंपारिक समिकरणे महत्वपूर्ण व निर्णाय ठरणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच निवडणूक रिंगणातील शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने हिच समिकरणे जुळविण्यावरच लक्ष केंद्रीत केले आहे. विशेषत: आपली पारंपारिक व्होट बँके अबाधित रहावी यासाठी शिवसेना व भाजपने पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केले आहेत. ‘हिंदूत्वाची व्होट बँक’ एक गठ्ठा मिळावी म्हणून डावपेच रंगले आहेत. ब्राह्मण, मारवाडी, जैन, सुवर्णकार या समाजातील बहुतांश मतदार आपल्याच पाठीशी रहावा म्हणून हे दोन्हीही अलकडचे मित्र मोर्चेबांधणीत दंग आहेत. या दोन्ही पक्षांना व्होट बँकेत मत विभागणी होणार याची धास्ती आहे. त्यामुळेच ते युद्ध पातळीवर मोहिमा राबवित आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यात हात घालून काँग्रेस व राष्ट्रवादीने बहुतांशी मतदान पदरात पाडण्यासाठी डावपेच लढविण्यास सुरूवात केली आहेत. घनसावंगी, परतूर या दोन मतदार संघात मराठा समाजाच्या मतांची मोठी विभागणी होईल याची धास्ती प्रमुख उमेदवारांना बसली आहे. त्यामुळेच ते अन्य म्हणजे ओबीसी समाजही पाठीशी रहावा म्हणून फिल्डींग लावत आहेत. काँग्रेस आघाडीचे उमेदवार पाचही मतदार संघात या निवडणूकीत काँग्रेसची पारंपारिक असणारी दलित-मुस्लिमांची व्होट बँक खंबीरपणे पाठीशी रहावी म्हणून, मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी या उमेदवारांनी विशेष बैठका घेतल्या. स्थानिक पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांबरोबर हितगूज केले. निवडणूक रिंगणात उतरलेल्या अन्य उमेदवारांचा आपल्या व्होट बँकेवर प्रभाव पडू नये म्हणून खबरदार घ्यावयास सुरुवात केली. जालन्यातून कैलास गोरंट्याल, परतूरमधून आ. सुरेश जेथलिया यांनी यासाठी अथक प्रयत्न सुरु केले आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी घनसावंगीतून आ. चंद्रकांत दानवे यांनी भोकरदनमधून दलित- मुस्लिममते पदरात पडावी म्हणून हालचाली गतीमान केल्या आहेत.शहरी व ग्रामीण भागात मतांची विभागणी अटळ आहे. कारण दुरंगी ऐवजी चौरंगी, पंचरंगी होणार आहे. यात मात्तबर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी विविध धर्म व जातींच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर हितगूज सुरू केले आहे. मत विभागणी टळावी हाच उद्देश आहे. तसेच त्यातील काहींना स्वत:कडे वळवून प्रचार यंत्रणेत सामावून घेतले आहे. वेगवेगळ्या भागात त्या-त्या समाजाचे प्राबल्य ओळखून हे उमेदवार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक समोर करू लागले आहेत. विशेषत: सभा-संमेलनातून या साऱ्यांना भाषणाची संधी दिली जात आहे. (प्रतिनिधी)
पुन्हा जाती पातीची जुनीच समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न
By admin | Updated: October 6, 2014 00:12 IST