बीड: जिल्हा परिषदेतील लेखा व वित्त विभागातील सहायक लेखाधिकारी दिगंबर गंगाधरे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात ठिय्या मांडला़ त्यानंतर कॅफो ताळ्यावर आले़ त्यांनी गंगाधरे यांची बदली रद्द केली़गुरुवारी ‘लोकमत’मध्ये ‘लेखा विभागात बदल्या नव्हे बदला’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ सहायक लेखाधिकारी दिगांबर गंगाधरे यांना लेखा विभागात पाच वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांची बांधकाम विभाग क्ऱ २ मध्ये स्थानांतराच्या नियमाखाली बदली करण्यात आली़ गंगाधरे यांनी नियमबाह्य कामांविरुद्ध आंदोलन केल्याने त्यांना लेखा विभागातून हलविले होते़ मात्र, हा नियम केवळ गंगाधरे यांनाच का लागू केला? असा सवाल मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे भगवान कांडेकर, सूर्यकांत जोगदंड, हरिश्चंद्र विद्यागर यांनी उपस्थित केला़ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य वित्त व लेखाधिकारी वसंत जाधवर यांच्या दालनात ठिय्या मांडला़ यावेळी पदाधिकारी व जाधवर यांच्यात खडाजंगीही झाली़ शेवटी जाधवर यांना नमते घ्यावे लागले़ त्यांनी गंगाधरे यांची बदली रद्द केली़ मागासवर्गी कर्मचाऱ्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा कांडेकर यांनी दिला. (प्रतिनिधी)
अखेर ‘ती’ बदली केली रद्द !
By admin | Updated: June 21, 2014 00:51 IST