उस्मानाबाद : जिल्हा परिषदेत सध्या बदल्या आणि समायोजनाची धामधूम सुरू झाली आहे. महिनाभरापासून सुरू असलेला संचमान्यतेचा घोळ अखेर शनिवारी मिटला आहे. सुधारित संचमान्यतेनुसार जिल्हाभरात तब्बल २३३ गुरूजी अतिरिक्त होत आहेत. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन आता करायचे कोठे? असा गंभीर प्रश्न जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासमोर उभा ठाकला आहे. दिवसेंदिवस शहरांसोबतच ग्रामीण भागातही खाजगी इंग्रजी शाळांचे जाळे विस्तारत आहे. याचा परिणाम विशेषत: ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांवर होताना दिसून येत आहे. त्यामुळे पटसंख्या कमी होवून शिक्षकांवर अतिरिक्तत होण्याची वेळ आली आहे. मागील तीन-चार वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली असता शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. यंदा शिक्षणाचा हक्क कायद्यातील निकषानुसार संचमान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत मागील एक ते दीड महिन्यापासून संच मान्यतेचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु, वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार संचमान्यतेच्या निकषांमध्ये बदल केला गेल्याने शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी हैराण झाले होते. त्यामुळे शुक्रवारपर्यंत खुद्द अधिकारीही जिल्ह्यातील किती गुरूजी अतिरिक्त होणार, या प्रश्नाचे उत्तर देवू शकत नव्हते. दरम्यान, शनिवारी अखेर संचमान्यतेला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार जिल्हाभरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गावरील तब्बल १४७ शिक्षक, मुख्याध्यापक अतिरिक्त होत आहेत. तसेच नववी ते दहावीच्या वर्गाचे ८६ गुरूजी अतिरिक्त झाले आहेत. संचमान्यता मिळाल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला असला तरी अतिरिक्त ठरलेल्या २३३ शिक्षकांचे समायोजन करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येणार आहेत, हे मात्र नक्की. (प्रतिनिधी) पेच अधिक गुंतागुंतीचा बनला... पहिली ते आठवीच्या वर्गासाठी मुख्याध्यापकांची २१४ मंजूर पदे असून कार्यरत ३८६ जण आहेत. त्यामुळे १७२ जण अतिरिक्त होत आहेत. तसेच प्राथमिक शिक्षकांची ३५२ पदे मंजूर असून ४ हजार ३०४ जण कार्यरत आहेत. या ठिकाणी ७४२ जण अतिरिक्त होत आहेत. तर दुसरीकडे १ हजार १८९ पदवीधर शिक्षकांची गरज आहे. मात्र, जिल्हाभरात ४२२ जणच कार्यरत असल्याने आणखी ७६७ पदवीधर गुरूजींची गरज आहे. त्यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त गुरूजींची नियुक्ती करण्यात येणार आहे. असे असले तरी आणखी १४७ शिक्षकांचा प्रश्न कायम आहे. तर दुसरीकडे आठवी ते दहावीपर्यंतच्या वर्गावरील ८६ गुरूजी अतिरिक्त आहेत. या दोन्हींची बेरीज केली असता हा आकडा २३३ वर जावून ठेपत आहे. त्यामुळे या गुरूजींचे समायोजन करण्यासाठी जागाच रिक्त नसल्याने शिक्षण विभाग चांगलाच पेचात सापडला आहे. आता नवीन वर्गावरच मदार जिल्हाभरात जी शाळा चौथीर्यंत आहे, त्या शाळेला पाचवीचा तर सातवीपर्यंतच्या शाळेला आठवीचा वर्ग जोडण्याबाबत शिक्षण विभागाने नियोजन केले होते. परंतु, शनिवारी शासनाकडून नवीन फतवा निघाला आहे. पाचवी अथवा आठवीचा नवीन वर्ग सुरू करण्यासाठी किमान २० पटसंख्या असणे बंधनकारक केले आहे. तसेच पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी दोन शाळांतील आंतर १ किमी तर आठवीच्या वर्गासाठी ३ किमी आंतर आवश्यक आहे. हे वर्ग सुरू करतानाही गरज प्राधान्याने लक्ष्यात घेण्याचे निर्देश दिले आहे. हा पर्यायही प्रशासनाला फारसा दिलासा देणारा ठरणार नाही. वसतिशाळा शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात? मानधन तत्त्वावर अत्यल्प मोबदल्यात कार्यरत असलेल्या वसतिशाळा शिक्षकांच्या दृष्टिने शासनाने हिताचा निर्णय घेतला. या शिक्षकांना कायम सेवेत घ्यावे, असा आदेश काढला आहे. परंतु, जिल्हाभरात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे आता या वसतिशाळा शिक्षकांना बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागणार आहे. याला शिक्षण विभागातील काही अधिकार्यांनी पुस्तीही दिली. मराठवाड्याचा विचार केला असता, सर्वच जिल्ह्यात अतिरिक्त गुरूजींचा प्रश्न आहे. त्यामुळे यांना मराठवाड्याबाहेर जावे लागणार आहे ! तालुकानिहाय आकडेवारी तालुकासंख्या भूम१४ कळंब२१ लोहारा१९ उमरगा३५ उस्मानाबाद५० परंडा०३ तुळजापूर०८ वाशी०३ एकूण१४७ (पहिली ते आठवीपर्यंत)
जिल्हाभरातील २३३ शिक्षक ठरले अतिरिक्त
By admin | Updated: May 10, 2014 23:52 IST