परभणी : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारांना विविध कागदपत्र अर्जासोबत जोडावी लागणार असून, शपथपत्रासोबत बँक खाते क्रमांकही द्यावा लागणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, २० सप्टेंबर रोजी अधिसूचनाही प्रकाशित झाली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करताना काय काळजी घ्यावी लागते, याविषयीची माहिती परभणी विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष शिंदे यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना शपथपत्र देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांकडून शपथही घेतली जाणार आहे. बँक खात्याचा क्रमांक, ओळखपत्र, अनामत रक्कमेची पावती आणि उमेदवाराच्या स्वाक्षरीची कॉपीही लागणार आहे. तसेच मतपत्रिकेवर कशा पद्धतीचे नाव असावे, याचाही नमुना द्यावा लागेल. उमेदवाराची वैयक्तिक माहिती, ओळखपत्रासाठी दोन फोटो, उमेदवार मतदार संघाबाहेरील असल्यास मतदार यादीची सत्यप्रत, सक्षम अधिकारी यांच्या समक्ष शपथ घेतल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे उमेदवारांना अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. निवडणुकीची अधिसूचना प्रकाशित झाली असून, जिल्हा प्रशासनाने ही अधिसूचना निवडणूक विभागाचे कार्यालय, ग्रामपंचायत, पंचायत समिती आदी ठिकाणी प्रसिद्ध केली आहे़ तसेच अधिसूचनेचे चावडी वाचनही होणार आहे़ (प्रतिनिधी)
शपथपत्राबरोबरच बँक खाते क्रमांकही लागणार
By admin | Updated: September 20, 2014 23:40 IST