फकिरा देशमुख , भोकरदनभोकरदन - जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळण्यास झालेल्या दिरंगाईची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी सायंकाळी दिले. त्यामुळे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी मंगळवारी तातडीने या प्रकरणाची चौकशी केली असून वरील दोन्ही तहसीलदारांवर निलंबन कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रकारामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.शासनाने सन २०१४ साठी शेतकऱ्यांना खरीप अनुदान मंजुर केले होते. त्यामध्ये भोकरदन तालुक्यातील ७८ हजार शेतकऱ्यांसाठी दोन्ही टप्प्यामध्ये ३९ कोटी ९० लाख ३९ हजार ६५२ रूपये निधी उपलब्ध करून दिला होता. त्याच प्रमाणे जाफराबाद तालुक्यातील ३४ हजार ६०८ शेतकऱ्यांसाठी २३ कोटी ६१ लाख ७७ हजार ३६८ रूपये निधी उपलब्ध झाला होता.सदर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी याद्यांसह बँकेत दिल्या होत्या. मात्र खाते क्रमांक व नावामध्ये चुका असल्याने राष्ट्रीयकृत बँकेने सुमारे १ कोटी रूपयाचे धनादेश परत तहसील कार्यालयाकडे परत पाठविले होते. त्यामुळे शेतकरी अनुदानपासुन वंचित राहिले. तसेच या कामात जाफराबादचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात व भोकरदनचे तत्कालीन तहसीलदार अविशकुमार सोनोने यांनी शेतकऱ्यांचे अनुदान बँकेत जमा करण्यास दिरंगाई केल्याची तक्रार १८ मे रोजी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केली.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक हे १९ मे रोजी अचानक भोकरदन तहसील कार्यालयात येऊन दाखल झाले. त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, भोकरदनचे प्रभारी तहसीलदार एस़आऱडोळस, नायब तहसीलदार आऱजे़डोळे, वाढेकर, स्टेट बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक संतोष जाधव, ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक शिंंदे ,आशीष पैठणकर यांच्याकडून अनुदान वाटपाचा आढावा घेतला.तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांनी अनुदान वाटपाच्या कामात सहकार्याची भूमिका ठेवून शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नायक यांनी दिले. त्यानंतर बँकांनी तहसील कार्यालयाकडे परत पाठविलेले धनादेश तात्काळ बँकेत जमा करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणात दोषी असलेल्या भोकरदन व जाफ्राबादच्या तहसीलदारांवर निलबंनाची कार्यवाही करण्याबाबत प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्ताकडे पाठविल्याची जोरदार चर्चा दिवस सुरू होती़ मात्र या कार्यवाहीच्या प्रस्तावामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे़ दरम्यान, भोकरदनमध्ये ७८ हजारांपैकी ५८ हजार ५०२ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झाले आहेत. (प्रतिनिधी)भोकरदन - जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना सन २०१४ खरीप हंगामासाठी दुष्काळी अनुदानासाठी भोकरदन तालुक्याला ३९ कोटी ९० लाख तर जाफ्राबाद तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी २३ कोटी ६१ लाख रूपयाची रक्कम दिली होती. मात्र महसूल विभागाच्या दप्तर दिरंगाई व बँकेच्या उदासीन धोरणामुळे भोकरदन तालुक्यातील ४ कोटी व जाफ्राबाद तालुक्यातील २ कोटी रूपये अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले नाही. ४याबाबतची तक्रार आ. संतोष दानवे यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीची लोणीकर यांनी गंभीर दखल घेतली असून महसूल विभागाला चांगलेच धारेवर धरले आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करण्याचे आदेश लोणीकर यांनी दिले आहेत. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची सूचना लोणीकर यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी घेतली.पालकमंत्री लोणीकर यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर भोकरदन व जाफराबाद तालुक्याच्या दोन्ही तहसीलदारांना याबाबतची सर्व माहिती घेऊन जालना येथे येण्याची सूचना महसूल विभागाकडून करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही तहसीलदार जालन्यात आले, परंतु त्याचवेळी जिल्हाधिकारी नायक हे अचानक भोकरदन तहसील कार्यालयात पोहोचले. त्यामुळे ऐनवेळी या तहसीलदारांना भोकरदन येथे जावे लागले.परतूर - नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्वाती खैरे यांनी पालिकेच्या मालकीचे भंगार विक्री करण्याच्या कार्यवाहीत अपहार केल्याच्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने चौकशी करून संबंधितांविरूद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी सूचनाही पालकमंत्री लोणीकर यांनी केली आहे.
दोन तहसीलदारांवर होणार कारवाई
By admin | Updated: May 20, 2015 00:17 IST