वाशी : तालुक्यातील घाटपिंपरी येथील रणरागिनीनी अवैध दारू विक्री करणाऱ्यास दारूविक्री करताना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. मागील अनेक दिवसापासून घाटपिंपरी येथे चोरून देशी दारूची अवैधरित्या विक्री होत होती. पोलिसांना या प्रकाराची कल्पना होती मात्र पोलीसही चोरट्या अवैधदारू विक्रीकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे अनेकांचे संसार धुळीस मिळत असल्याचे निदर्शनास आल्यांनतर घाटपिंपरीच्या महिला सरंपच जयश्री बंकट गोडसे यांनी पोलिसांना मोबाईलवरून गावात अवैधरित्या दारू विक्री होत असून आपण तात्काळ कारवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. अवैधदारू विक्रीच्या कारणावरून गेल्या महिन्यात कनगऱ्याचे रामायण ताजे असल्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी घाटपिंपरी येथे जाऊन महिलांनी पकडलेली दारू ताब्यात घेतली व पळून जाणाऱ्या अवैध दारू विक्रत्याच्या मुस्क्या आवळून त्याला गजाआड केले. घाटपिंपरीच्या सरपंच जयश्री गोडसे, दौलतबी पठाण, सिंधु सातपुते, छबुबाई पवार, कलावती सातपुते, रावसाहेब सातपुते आदिनी अवैध दारू विक्री करणारा आरोपी सतिश आंनदराव सातपुते यांस पालिसांच्या ताब्यात दिले असून या घटनेची फिर्याद पोलीस पाटील प्रकाश माणिकराव पाटील यांनी दिली आहे. पोलिसांनी अवैध मार्गाने विक्री करण्यात येणाऱ्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून आरोपीस गजाआड करून त्याच्याविरूध्द दारूबंदी कायदा कलम ६५ ई नुसार कारवाही केली आहे. घाटपिंपरीच्या सरपंच जयश्री गोडगे यांनी त्यांच्या समवेतच्या रणरागिनीना सोबत घेऊन चोरून विकली जात असलेली अवैध दारू व आरोपीस सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या स्वाधीन केले. (वार्ताहर)
घाटपिंपरीत अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
By admin | Updated: August 6, 2014 02:27 IST