परभणी : पीककर्ज वाटप करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला़उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीत विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली़ या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली़ पीककर्जाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पीककर्जाचा लाभ देण्याच्या सूचना केल्या़ बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, पीक कर्ज वाटपात जर टाळाटाळ होत असेल तर वेळ प्रसंगी अशा बँकांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला़ या बैठकीस महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री सुरेश धस, आ़ रामराव वडकुते, आ़ विक्रम काळे, जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष डुंबरे, मनपा अयुक्त अभय महाजन, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी झावरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते़ पीककर्जासाठी बँकांनी नवीन खाते उघडण्यास प्राधान्य द्यावे, असेही पवार यांनी सांगितले़ आॅगस्टमध्ये राज्यात सरासरीएवढा पाऊस पडेल, असा अंदाज या क्षेत्रातील विविध यंत्रणांकडून वर्तविला जात आहे़ असे असले तरी टंचाई आराखडे तयार करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत़ परभणी जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढते आहे़ पुरेशा पावसाअभावी सध्या पेरण्या लांबल्या असून, सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणती पिके घेता येतील, कोणती पिके उपयुक्त ठरतील, याची माहिती कृषी विभाग आणि विद्यापीठाने द्यावी, असेही पवार यांनी सांगितले़ या आढावा बैठकीमध्ये परभणी शहरातून जाणाऱ्या बाह्य वळण रस्त्याच्या कामासंदर्भातील कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश पवार यांनी दिले़ (प्रतिनिधी)
तर बँकांवर कारवाई
By admin | Updated: August 7, 2014 01:26 IST