उस्मानाबाद : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातील ‘एअर कंडीस्रर’ने (एसी) सकाळी दहा वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे सदरील आग तातडीने विझविण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांचा कक्ष जिल्हा परिषद इमारतीतील पहिल्या मजल्यावर आहे. तत्कालीन ‘सीईओ’ सुमन रावत यांच्या कार्यकाळात सदरील कक्षाचे नुतनीकरण करून ‘एसीही’ बसविण्यात आले आहेत. साधारणपणे हे काम करून पावणेदोन ते दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. असे असतानाच गुरूवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दालनाच्या पश्चिम दिशेच्या भिंतीवर बसविण्यात आलेल्या ‘एसी’ने पेट घेतला. हा प्रकार दालनाबाहेरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर प्रसंगावधान बाळगून त्यांनी आग विझविली. या आगीमुळे भिंतीच्या फर्निचरचा काही भाग जळाला आहे. दरम्यान, या आगीमुळे दालनामध्ये मोठ्या प्रमाणत धुराचे लोट निर्माण झाले होते. त्यामुळे ही आग विझविण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. सदरील घटना घडली तेव्हा, सीईओ रायते हे दालनामध्ये उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)
‘सीईओं’च्या दालनातील ‘एसी’ने घेतला पेट
By admin | Updated: April 8, 2016 00:24 IST