येरमाळा : मागील दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात दरोडेखोरास ४ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा जेरबंद करण्यात येरमाळा पोलिसांना यश आले आहे. सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनेक चोऱ्या प्रकरणी हवा असणारा कुख्यात दरोडेखोर महादेव पवार हा २०१२ सालापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. दोन दरोडे तसेच एका खुनी दरोड्याच्या गुन्ह्यात सामील असल्याची पोलिस दप्तरात नोंद होती. ४ आॅगस्ट रोजी तो येरमाळा येथील कृषी विभागाच्या कृषी गुणन बीज केंद्राच्या ठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या खबरीची गुप्तता राखून रात्री ९.४५ च्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला व महादेव पवार यास जेरबंद केले. सहायक पोलिस निरीक्षक एम. एम. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पवार यास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, याप्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. एन. शेळके करीत आहेत. (वार्ताहर)
फरार झालेला कुख्यात दरोडेखोर जेरबंद
By admin | Updated: August 6, 2014 02:27 IST