कोवीडमुक्त गावे ४४६ : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सरपंच, मुख्याध्यापकांना सूचना
औरंगाबाद : कोविडमुक्त गावांतील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मुभा दिली आहे. त्यानुसार शाळा उघडण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी जिल्ह्यातील कोविडमुक्त गावांतील मुख्याध्यापकांची ऑनलाईन बैठक घेतली व १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या.
जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या १,११२ शाळा कार्यरत असून यापैकी कोविडमुक्त ४४६ गावांत ८५९ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. मंगळवारी डॉ. गोंदावले यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन बैठकीत ६५० मुख्याध्यापक सहभागी झाले होते. शासनाने कोविडमुक्त गावांतील सरपंचांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली असून ग्रामसेवक हे त्या समितीचे सदस्य आहेत. मुख्याध्यापकांनी या समितीची संमती घेऊनच संबंधित गावांतील शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना या बैठकीत शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी केल्या. एवढेच नव्हे, तर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीदेखील तेवढीच आवश्यक आहे. वर्ग क्षमतेच्या निम्म्या विद्यार्थी संख्येने शाळा सुरू कराव्यात, एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा, दुपारची जेवणाची सुटी न देता सलग ३-४ तास वर्ग घेतल्यानंतर शाळेला सुटी द्यावी व मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस सरपंच समितीची पूर्वपरवानगी घेऊन गुरुवारपासून शाळा सुरू कराव्यात, या सूचना मुख्याध्यापकांना या बैठकीत केल्या.
चौकट.....
प्राथमिक शाळाही सुरू झाल्या पाहिजे
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. शिक्षण विभागाने १५ जुलैपासून राज्यातील कोविडमुक्त गावांतील पहिल्या टप्प्यात ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ८ वीच्या खालचे वर्ग सुरू करण्याबाबत अनेक पालक, शिक्षक हे शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा करत आहेत.
त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शाळा सुरू करण्याबाबत जनमत चाचणीद्वारे (सर्वेक्षण) पालकांची मते जाणून घेतली. यामध्ये ८५ टक्के पालकांनी १ ली ते ७ वीचेही वर्ग सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. या सर्वेक्षणात औरंगाबाद जिल्ह्यातील १२ हजार ९८८ पालकांचा समावेश आहे.
चौकट........
प्राथमिक शाळांबाबत सूचना नाहीत
शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, गणेशवाडीचे सरपंच व ग्रामस्थांनी स्वत:च्या जबाबदारीवर प्राथमिक शाळा सुरू केली आहे. मात्र, पहिली ते सातवीपर्यंत वर्ग सुरू करण्यास शासनाच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. आता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जातील. दोन-तीन महिने वातावरणाचा आढावा घेतल्यानंतर प्राथमिक शाळांचा निर्णय अपेक्षित आहे. जिल्ह्यात १ ली ते १० वीपर्यंत ४ हजार ५५५ अनुदानित शाळा आहेत.