अंबड : शहरातील नगर पालिकेच्या दुकानांचे करार संपलेल्या ७० पेक्षा अधिक दुकानदारांना नगर पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. तसेच करार व इतर बाबींची तपासणी करण्साठी नव्याने सर्वेक्षण होणार असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकमतमध्ये नगर पालिकेच्या भोंगळ कारभारावर प्रकाशझोत टाकून ओपन स्पेस व गाळेधाराकांबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. पालिकेने या वृत्ताची दखल घेत ७० व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.नगरपालिकेने भाडेतत्वावर दिलेल्या दुकानांपैकी बहुतांश दुकानांचे करार संपून अनेक वर्षे झाली आहेत. या सर्व दुकानांचा फेरलिलाव करुन पालिकेस जास्तीस जास्त महसूल देणाऱ्या व्यापाऱ्यांना ही दुकाने भाडेतत्वावर देणे बंधनकारक असतानाही पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अद्यापही या दुकांनाचा फेर लिलाव झालेला नाही. व्यापाऱ्यांनी पालिकेच्या भाडेतत्वावर घेतलेल्या दुकानांची परस्पर खरेदी-विक्री केली आहे. या सव प्रकाराने पालिकेकडून संपूर्ण माहिती मागविण्यात येणार असून, याबाबत सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोणत्या व्यापाऱ्यांचा करार संपला व किती व्यापाऱ्यांनी दुकाने परस्पर विक्री केली, याची माहिती सर्वेक्षणातून पुढे येणार आहे. दरम्यान, पालिकेच्या धास्तीने अनेक व्यापाऱ्यांत खळबळ उडाली असून, काहींनी कागदपत्रांची जुळवा जुळव सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले.पालिकेच्या मालकीच्या एकूण ९३ दुकानांची गाळे व्यापाऱ्यांना ठराविक काळाच्या भाडेतत्वावर दिलेली आहेत. पालिकेच्या किरायाच्या जागेवर एकूण ६५ दुकाने सुरु आहेत.यापैकी बहुतांश व्यापाऱ्यांचा भाडेतत्वाचा करार संपुन अनेक वर्षे झाली आहेत. तसेच शहरातील खाजगी जागांवर स्थापन करण्यात आलेल्या दुकानांनीही पालिकेचा कर अनेक वर्षांपासून दिलेला नाही.वास्तविक भाडेतत्वावर दिलेल्या दुकानांचा कराराचा कालावधी संपताच पालिकेने ही दुकाने भाडेतत्वावर देण्यासाठी पुनर्लिलाव करणे गरजेचे होते.पण तसे झालेले नाही. (वार्ताहर)संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार...ंयासर्व प्रकरणाची संपूर्ण माहिती पालिका प्रशासनास असतानाही प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे पालिका प्रशासनास कोट्यवधीच्या महसुलास मुकावे लागले ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान, नगर पालिकेतील अधिकारी धर्मा खिल्लारे म्हणाले, करार संपलेल्या ७० दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालिका शहरातील असलेल्या गाळ्यांचे नव्याने सर्वेक्षण करुन वस्तुस्थिती तपासणार आहे.
७० गाळेधारकांना नोटिसा
By admin | Updated: June 26, 2014 00:39 IST