उस्मानाबाद : जून महिना सरला असतानाही जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळे टंचाईचे संकट दिवसागणिक तीव्र बनू लागले आहे. आजघडीला टंचाईग्रस्त गावांना ६९ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. अधिग्रहणाची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे.गतवर्षी अर्ध्याअधिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. विशेषत: भूम, वाशी, कळंब आणि परंडा या तालुक्यावर पावसाची वक्रदृष्टी राहिली. परिणामी या भागातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळेच भूम तालुक्यातील वालवड सर्कलमधील अनेक गावांना डिसेंबरमध्येच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. आजही भूम तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरु आहेत. दरम्यान, पाऊस न पडल्यामुळे टंचाईचे संकट अधिक गडद होत असल्याने शासनाने आता टंचाई उपाययोजनांसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याचप्रमाणे टँकर सुरु करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या सूत्रांकडून मिळाली.
जिल्ह्यात ६९ टँकर सुरु
By admin | Updated: July 3, 2014 00:19 IST