उस्मानाबाद/वाशी/कळंब/ उमरगा/लोहारा : गावे हागणदारीमुक्त होऊन वैयक्तिक शौचालयांचा वापर वाढावा, या उद्देशाने मंगळवारी सकाळी जिल्हाभरात ठिकठिकाणी गुडमॉर्निंग पथकाने कारवाई करीत ५४ लोटाबहाद्दरांना पकडले. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गुडमॉर्निंग पकथकाच्या या मोहिमेमुळे लोटाबहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.ग्रामीण भागात सार्वजनिक, वैयक्तिक आणि शौचालयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आर्थिक परिस्थिती व आवश्यक जागेची उपलब्धी असूनही अनेकजण शौचालयाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करतात. तर काहीजण शौचालय बांधूनही त्याच्या वापराकडे कानाडोळा करतात. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. निर्मल भारत अभियान कक्षाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी विशेष अनुदानही देण्यात येत आहे. तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, ही बाब लक्षात आल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा ग्रामपंचायतीमध्ये गुडमॉर्निंग पथकाने कारवाई केली.उस्मानाबाद तालुक्यातील अंबेहोळ येथे केलेल्या कारवाईमध्ये ७ व्यक्तींना पकडण्यात आले. त्यासोबतच तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथे दोन, उमरगा तालुक्यातील वागदरी येथे ७, लोहारा तालुक्यातील कास्ती, लोहारा बु., आणि बेंडकाळ येथे १३, कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथे १५, वाशी तालुक्यातील कन्हेरी येथे ९, भूम तालुक्यातील गोरमाळा व कृष्णापूर येथे ८ अशा एकूण ५४ व्यक्तींविरूद्ध या पथकाने कारवाई केली. दरम्यान, कारवाईनंतर पोलिसांनी सर्वसंबंधितांना न्यायालयासमोर हजर करून दंडात्मक कारवाई केली. यामध्ये वाशी तालुक्यात पकडण्यात आलेल्या तीन महिलांना ग्रामपंचायतस्तरावर प्रत्येकी २०० रूपये दंड करून सोडून देण्यात आले. उर्वरित व्यक्तींना न्यायालयासमोर हजर केले असता प्रत्येकी ५० रूपये दंड केला. लोहारा तालुक्यातील लोटाबहाद्दरांना प्रत्येकी १०० रूपये, उमरगात येथे प्रत्येकी ३०० रूपये तर भूम येथे प्रत्येकी ५०० रूपये दंड न्यायालयामार्फत करण्यात आला आहे. कळंब येथील पथकात प्रभारी गटविकास अधिकारी यमपुरे, विस्तार अधिकारी व्ही. व्ही. बावीकर, तोडकर, पर्यवेक्षिका झांबारे, आगलावे, स्वच्छता निरीक्षक राहुल बनसोडे, प्रेरक अमोल सरवदे आदींचा समावेश होता. वाशी येथील पथकात गटविकास अधिकारी राजगुरू, विस्तार अधिकारी जी.टी.वग्गे, समन्वयक आर.एस.मस्के, सपोनि विनोदकुमार म्हेत्रेवार यांच्यासह हवालदार नितीन पाटील, उपेंद्र कुलकर्णी, महिला कॉन्सटेबल आडसूळ यांचा समावेश होता. तुळजापूर तालुक्यात गटविकास अधिकारी व्ही़ के़ खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली गटसमन्वयक बी़ ए़ अंकुश, आऱ ए़ शेख यांच्या पथकाने कारवाई केली. ेयावेळी तुळजापूर पोलिस ठाण्याचे सपोनि चौधरी यांनी बंदोबस्त प्रमुख म्हणून काम पाहिले़ पथकामध्ये लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए. सी. शिंदे, विस्तार अधिकारी एस. एस. ढाकणे, केंद्रप्रमुख आर. एन. गरड, समन्वयक बालाजी सूर्यवंशी, पोकॉ. जे. बी. वाघोलकर यांचा समावेश होता. दरम्यान, लोहारा शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यातच शौचालयासाठी पाणी वापरणे अवघड झाल्याचे नागरिकांतून सांगण्यात येत आहे. अन् नवरदेवही सापडलाशेळका धानोरा (ता. कळंब) येथे अचानक राबविण्यात आलेल्या या कारवाईने ग्रामस्थांत एकच खळबळ उडाली. पथकाच्या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर अनेकजण लोटा घेवून घरी परतले. या कारवाईमध्ये एक नवरदेवही सापडला. मंगळवारी दुपारी आपले लग्न असल्याचे सांगितल्यानंतर व पथकाला विनंती केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.गुडमॉर्निंग पथकाने कारवाई केल्यानंतर गावातीलच काही मंडळी या कारवाईस विरोध करतात. त्यामुळे अशांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाने दिल्या आहेत.अधिकारी नियुक्तीकडे ‘झेडपी’चा कानाडोळाशौचालये नसलेले आणि वापर न करणाऱ्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार सादरकर्ता अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना जि.प.ला दिली होती. याला दोन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही जिल्हा परिषदेकडून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी ज्योतीबा पाटील यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेला पत्र पाठवून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत सुचविले आहे. कारवाईत अडथळेगुडमॉर्निंग पथकामध्ये पोलिस अधिकाऱ्यांनाही सोबत घेतले जाते. कळंब येथील पथकाने पोलिस कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. त्यानुसार एक कर्मचारी आला. परंतु, गाडीत न बसता तोही कळंब पंचायत समिती आवारातूनच परतला. त्यामुळे पकडलेल्या १८ लोटाबहाद्दरांवर कोणतीही कारवाई व दंड आकारता आला नसल्याचे पथकातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
५४ लोटाबहाद्दर पकडले
By admin | Updated: June 11, 2014 00:32 IST