३३ जणांना मिळाली नियुक्ती
--
औरंगाबाद : कोरोना, लॉकडाऊनच्या वातावरणात सर्वच क्षेत्रात नोकऱ्यांवर गंडांतर आले. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद प्रशासनाने ३३ जणांना नोकरी देत दिलासा दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या उपस्थितीत अनुकंपा प्रतीक्षा यादीतील ३३ जणांना सोमवारी समुपदेशन प्रक्रियेनंतर नियुक्तीपत्र देण्यात आले.
अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत रुजू करून घेण्यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियमानुसार रिक्त झालेल्या जागेवर नियुक्ती दिली जाते. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार संभाव्य यादी जाहीर करून आक्षेप मागवण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन प्रक्रिया आयोजित केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करीत उमेदवार व नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर ३३ जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यात ११ कनिष्ठ सहायक, १५ परिचर, तीन कनिष्ठ सहायक, दोन ग्रामसेवक, एक वरिष्ठ सहायक लेखा व एका आरोग्य सेवकास नियुक्तीपत्र देण्यात आले.